वन महोत्सवा निमित्ताने आकाशवाणी केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण
नागपूर ( दि. १९ सप्टेंबर २०२४ ) वन महोत्सव निमित्ताने नागपूर आकाशवाणी केंद्राच्या परिसरात वन विभाग व आकाशवाणी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमीता विश्वास यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी आकाशवाणी केंद्राचे कार्यालय प्रमुख रमेश घरडे, कार्यक्रम प्रमुख रचना पोपटकर गजभिये, नागपुर वनवृत्ताच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी, नागपूर वनवृत्ताचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा, प्रसिध्दी व माहिती अधिकारी (वने) रामेश्वरी बोंगाळे हे यावेळी उपस्थिती होते.
१५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. याव्यतिरिक्त केंद्र शासनाकडून अलिकडेच 'एक पेड माँ के नाम" ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये अमृतवृक्ष आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत आहे. याचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वन विभागातील व आकाशवाणी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
केंद्र शासनाच्या "एक पेड माँ के नाम" या योजनेची पूर्तता व्हावी तसेच राज्याने यापूर्वी अवलंबिलेले वृक्ष लागवडीचे धोरण अखंडपणे पुढेही चालू राहावे आणि या कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामुहिक पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना माफक दरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात वन महोत्सवाच्या कालावधीत "अमृतवृक्ष आपल्या दारी" योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी, आणि प्रत्येकाचा यात सहभाग मिळावा तसेच येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या हेतूने वर्ष २०२४ मध्ये महाराष्ट्र वनविभागामार्फत वनमहोत्सव काळात अधिकाधिक वृक्षारोपण व त्यांचे संगोपन करण्याकरिता वनविभागाकडून कार्यवाही केली जात आहे. या योजनेमध्ये विविध शासकीय, अशासकीय, कार्यालय आणि संस्था तसेच प्रत्येक नागरिकाने अमृत वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती शोमीता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य यांनी या प्रसंगी केले. तसेच सदर वृक्षारोपन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आकाशवाणी कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांचे यावेळी अभिनंदन केले.
यावेळी वन विभागातील व आकाशवाणी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित




























































































































































































































































































































































































































