राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अभिनेते अंकुश चौधरी यांची उपस्थिती
नागपूर ( दि. ११ जाने. २०२५) नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग नागपूर, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचे उद्या रविवारी १२ जानेवारी रोजी उद्घाटन होत आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे सायंकाळी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून मराठी सिने कलावंत अंकुश चौधरी यांची विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
ग्रंथ दिंडीने प्रारंभ होत असलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे भूषविणार असून स्वागताध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते हे राहतील. याप्रसंगी सर्व आमदार अभिजीत वंजारी, मोहन मते, प्रविण दटके, विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिध्देश्वर काळुसे, डस्कलाईन इंफ्रा. लि. चे संचालक समीर महाजन, विदर्भ साहित्य संघाचे सचिव विलास मानेकर आणि मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे पियुष आंबुलकर यांची विशेष उपस्थिती राहील. मान्यवरांच्या हस्ते यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे.
पुढचे दोन दिवस ‘बालभारती आणि मराठी मनाचे नाते’, ‘ज्ञानभाषा प्रवासात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची भूमिका’ विषयावर परिसंवाद, व ‘मराठी सद्यस्थिती व ज्ञानभाषा दिशा’ विषयावर चर्चासत्र, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम राहील. याशिवाय, ‘माझी शाळा-सुंदर शाळा’ ही उपक्रमशील शाळा स्पर्धा, पुस्तकांचे गाव आणि लेखनाची वस्ती, पुस्तक प्रदर्शन व विविध स्टॉल येथे राहणार आहे.
मराठी भाषाप्रेमी, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी संमेलनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र काटोलकर, कार्यकारी अध्यक्ष रमेश बक्षी, संयोजन सचिव डॉ. वंदना बडवाईक व सह संयोजक संध्या महाजन यांनी केले आहे.




























































































































































































































































































































































































































