आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे संविधान चौकात मनपा प्रशासनाविरोधात निदर्शने
★ यशवंत स्टेडियममधील गाळा क्र. ७४ चे सील काढण्याची मागणी
★ आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आक्रमक
नागपूर: ( दि. २४ ऑगस्ट २०२६ ) नागपूर महानगरपालिकेच्या कारवाईविरोधात आज संविधान चौकात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्या वतीने मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. मनपा प्रशासनाने यशवंत स्टेडियम येथील गाळा क्रमांक ७४ कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कार्यालय सील करून जप्तीची कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
यशवंत स्टेडियम येथील शॉप नंबर ७४ मध्ये १९८२ पासून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघा चे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाद्वारे अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय आणि भटके विमुक्त समाजातील अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना शासकीय व निमशासकीय नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जाते.
बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९८२ ते २०१८ या काळात मनपाचा सर्व कर नियमितपणे भरण्यात आला होता. परंतु, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे हे कार्यालय चार ते पाच वर्षे बंद राहिल्याने कराची थकबाकी राहिली. मनपा प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार करून थकबाकीची रक्कम हप्त्या-हप्त्याने भरण्यास तयार असल्याचे कळवले होते.
नाईलाजास्तव संस्थेने या संदर्भात दिवाणी न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली व त्याची माहिती मनपा प्रशासनाला देण्यात आली. मात्र, माहिती मिळताच अवघ्या दोन ते तीन दिवसांत, म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी मनपाच्या पथकाने धडक देऊन गाळा सील करण्याची आणि जप्तीची कारवाई केली, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे.
या कार्यालयामध्ये आंबेडकरी चळवळीतील अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक साहित्य, पुस्तके आणि दस्तऐवज जतन करून ठेवलेले आहेत. शटरला लावलेले सील जर तातडीने काढण्यात आले नाही, तर हे दुर्मिळ साहित्य कीड लागून व योग्य देखभालीअभावी कायमचे नष्ट होईल, ज्याची भरपाई कधीही होऊ शकणार नाही, अशी भीती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी व्यक्त केली आहे.
गाळा क्रमांक ७४ ला लावलेले सील त्वरित हटवण्यात यावे. थकबाकीची उर्वरित रक्कम हप्त्यांच्या स्वरूपात भरण्याची परवानगी द्यावी. आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक व दुर्मिळ साहित्याचे नुकसान होण्यापासून रक्षण करावे. संविधान चौकातील निदर्शनांनंतर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या शिष्टमंडळाने देवेंद्र बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनमा आयुक्त यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले शिष्टमंडळात प्रवीण आवळे, प्रा.रमेश दुपारे, प्रकाश कांबळे, हंसराज उरकुडे,जयदेव चिवंडे, के.टी.कांबळे उपस्थित होते. मनपा प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बागडे यांनी यावेळी दिला.
आंदोलनात राजु कांबळे, रोहित पांडे. पवण वर्मा. नरेश खना, तन्हा नागपूरी, मनोहर इंगोले, रमेश डकाह, रमेश पांडुरंग दुपारे, गुडू रंगारी, सुभाष हाडके, गौतम बागडे, प्रकाश ठोसर सह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

































































































































































































































































































































































































































































































