२०२४ च्या निवडणुका शिंदे - फडणवीस यांच्याच नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : ( दि. २७ ) २०२४ च्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच होतील, असे ठाम मत भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, " प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण व्हावे हे पक्षाने ठरवायचे असते. याशिवाय बहुमत सुद्धा महत्वाचे असते."
ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे यांनी यावेळी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर पंचायतच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले," नगर पंचायतमधील काही नगरसेवकांनी तीव्र विरोध करीत मंजूर ठराव नामंजूर करण्याची मागणी केली. राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या कॉंग्रेस नगरसेवकांवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
• तुम्ही मोदीजींचे फोटो लावूनच जिंकले!
उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी व अमितभाई शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. शिवसेनेचे आमदार मोदीजींचे फोटो लावून निवडून आणले आहेत. युतीत असताना मोदीजींचे तोंडभरून कौतुक करीत होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर बसल्यावर मोदीजींविषयी एकेरी बोलू नये, अन्यथा चुकीतून चूक होते. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा सल्ला बावनकुळे यांनी दिला.
• लोकाधिकार अबाधित ठेवून निर्णय
रिफायनरी बारसू येथेच व्हावी यासाठी परवानगी द्यावी, असे स्पष्ट पत्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला दिले होते. त्याचवेळी ठाकरे यांनी लोकसुनावणी घेतली असती तर त्यांना आता बोलता आले असते. बारसू प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर नेते याबाबत जनतेचे अधिकार अबाधित राखून योग्य निर्णय घेतील, अशी आशा मला आहे.
-------
बार्शी टाकळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी कॉंग्रेस नगरसेवकांनी विरोध केला. यातून कॉंग्रेसचे बेगडी प्रेम समोर आले. याबाबत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर द्यावे, अशीही मागणी मी करतो.




























































































































































































































































































































































































































