बलात्काराच्या आरोपीने चक्क पोलिस कोठडीत घेतला गळफास
★ जरीपटका पोलिस ठाण्यातील घटना
★ ठाणेदारांसह ६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शक्यता
नागपूर, दि. २२ जानेवारी २०२६ )नागपुरातील अल्पवयीन प्रेयसीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली उत्तरप्रदेशातील एका तरुणाला अटक करण्यात आली. त्या युवकाने चक्क पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्येच चादरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. नागेंद्रकुमार रामजी भाटिया (१९) असे पोक्सो प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक केल्यानंतर कोठडीत आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी ठाणेदारासह आठ ते दहा जणांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेंद्रकुमार भाटिया हा मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील असून, तो हंडिया गावातील रहिवासी होता. त्याचे इन्स्टाग्रामवरून नागपुरातील जरीपटका येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांचेही इन्स्टाग्रामवरून चॅटिंग झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तो गेल्या महिन्यात दोन वेळा नागपुरात येऊन मुलीला भेटून गेला. त्यानंतर दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. आठवड्याभरापूर्वीच नागेंद्रकुमार हा नागपुरात आला आणि मुलीसोबत पळून गेला. दोघेही प्रयागराजमध्ये काही दिवस राहिले. दुसरीकडे मुलीच्या आई-वडिलांनी जरीपटका पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. या गुन्ह्याच्या तपासात जरीपटका पोलिसांनी नागेंद्रकुमारला प्रयागराज पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशातून अटक केली होती. बुधवारी त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. जरीपटका पोलिस आरोपीची चौकशी करीत होते. बुधवारी रात्री त्याने लॉकअपमध्येच गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ठाण्यातील कर्मचाऱ्यांना लॉकअपमध्ये तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
★ २० मिनिटांपर्यंत आत्महत्येचा प्रयत्न !
आरोपी नागेंद्रकुमार हा पहाटे पाच वाजता झोपेतून उठला. त्याने अंगावर ओढायला दिलेली चादर फाडली. शौचालयातून डबा आणून त्यावर चढून चादर लॉकअपच्या गजाला बांधली. आत्महत्या करण्यापूर्वी विचार करीत १० मिनिटे लॉकअपमध्येच फेऱ्या मारल्या. शेवटी त्याने आत्महत्येचा निर्णय पक्का केल्यानंतर गळफास घेतला. या २० मिनिटांमध्ये एकही पोलिस कर्मचारी लॉकअपमध्ये फिरकला नाही. अन्यथा आरोपीचा जीव वाचला असता.
★ सीआयडी सकाळीच दाखल
आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेतल्यामुळे 'कस्टोडिअल डेथ' प्रकरण असल्यामुळे सीआयडीचे पथक सकाळीच जरीपटका पोलिस ठाण्यात दाखल झाले. पथकाने तपास सुरू केला आहे.
★ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू ?
प्रेमसंबंधातून लग्न करण्याच्या इराद्याने पळून गेल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असल्यास आरोपीची मानसिकता ढासळलेली असते. बलात्कारासारखा भयंकर आरोप असल्यामुळे आरोपी अस्वस्थ असतो. लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या हालचालींवर गार्ड ड्युटी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे लक्ष असायला हवे. मात्र, जरीपटका ठाण्यातील एकाही पोलिस कर्मचाऱ्याने या बाबीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आरोपीच्या मृत्यूस पोलिसच जबाबदार असल्याची चर्चा आहे.




























































































































































































































































































































































































































