नागपूर विभागीय आयटीआय निदेशकांचा भव्य मेळावा उद्या
नागपूर ( दि. 31 में 2026 ) महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागाच्या वतीने विभागीय मेळाव्याचे आयोजन रविवार 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुंडले पब्लिक स्कूल, शासकीय आयटीआय समोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याला नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने निदेशक बंधू-भगिनी उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून पदवीधर आमदार अभिजीत वंजारी हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे माजी सरचिटणीस भोजराज काळे हे राहणार असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सध्या नागपूर विभागात एकूण 78 शासकीय आयटीआय कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या 419 आयटीआय संस्था सुरू आहेत. देशभरात कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जात असताना आयटीआय संस्था या कौशल्य विकासाच्या प्रमुख केंद्रस्थानी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वाढती औद्योगिक गरज, कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची मागणी आणि शासनस्तरावरून कौशल्य विकासासाठी होत असलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवर आयटीआय क्षेत्राचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.
या मेळाव्यात आयटीआय शिक्षक व निदेशकांच्या विविध समस्या, हक्क, जबाबदाऱ्या, प्रलंबित मागण्या तसेच व्यवसाय शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
संघटनेच्या वतीने शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने संचालनालय, मंत्रालय व शासन दरबारी मांडले जात असून त्यासंदर्भातही या मेळाव्यात दिशा ठरणार आहे. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे मार्गदर्शन आणि पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांचे संबोधन याबाबत निदेशकांमध्ये विशेष उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.
ही माहिती विभाग संपर्कप्रमुख तथा राज्य सहचिटणीस शिवाजी ढुमणे, राज्य सदस्य साहेबराव गूडधे आणि विभागीय अध्यक्ष प्रेमानंद भैसारे जिल्हा अध्यक्ष जयंत टालाटुले यांनी दिली असून सर्व निदेशकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


























































































































































































































































































































































































































































