हिंगण्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघडकीस; दोन तरुणांना अटक
लाखांचा मुद्देमाल जप्त; हिंगणा पोलिसांची धडक कारवाई
हिंगणा (दि. २ आक्टों २०२६ ): घरगुती व व्यावसायिक सिलिंडरमधून बेकायदेशीरपणे गॅसची चोरी करून काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा हिंगणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बोलेरो वाहनासह ७ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.०५ ते ४.४० वाजताच्या दरम्यान कोतेवाडा रोड, वृंदावन सिटी परिसरामध्ये करण्यात आली.
हिंगणा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे श्री. नायडू यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या बोलेरो वाहनाची (MH 12 RN 8673) पाहणी केली. तेथे दोन तरुण कोणत्याही सुरक्षेची काळजी न घेता स्टीलच्या नळीच्या साह्याने भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना रंगेहाथ पकडले गेले. दिनेश खेताराम बिश्नोई, वय २० वर्ष, रा. कानासर, जि. फलोदी, राजस्थान, संजय मांगीलाल बिश्नोई, वय १९ वर्ष, रा. बोजासर, जि. फलोदी, राजस्थान, दोघेही सध्या मुक्काम: सिल्व्हर सिटी, कोतेवाडा, हिंगणा, नागपूर असे आरोपीचे नाव असून आरोपीकडून एचपी कंपनीचे भरलेले व रिकामे घरगुती व व्यावसायिक सिलिंडर, १ बोलेरो पिकअप वाहन (MH 12 RN 8673), इलेक्ट्रिक वजनकाटा व स्टीलची नळी, १ मोबाईल फोन व सिलिंग लेबल्स असा एकूण ७,९७,५०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.
मानवी जीवितास धोका निर्माण करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी, सह पोलीस आयुक्त यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनि संतोष राठोड, पोहवा अरुण कांबळे, पोलिस अंमलदार अनिल झाडे व प्रणित बंड यांनी केली.



























































































































































































































































































































































































































































































































































