हद्दपार गुन्हेगार प्रज्वल उर्फ धम्मा बागडे याला वाडी परिसरात अटक
गुन्हे शाखा वाहन चोरी विरोधी पथकाची धडक कारवाई, एक हत्तीमार चाकू जप्त
नागपूर:(दि. ३ नोव्हें २०२६ ) शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार विनापरवाना शहरात दाखल होऊन शस्त्र बाळगून वावरत असताना गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. प्रज्वल उर्फ धम्मा अनिल बागडे (२५, रा. रामजी आंबेडकर नगर, वाडी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजताच्या सुमारास वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार मंगळवारी हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. यादरम्यान, हद्दपार असलेला प्रज्वल बागडे हा हातात शस्त्र बाळगून खडगाव रोड परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाडी हद्दीतील खडगाव रोड, खाडे ले-आऊट, जनजागृती फायनान्सजवळ सापळा रचून वर्णनानुसार एका इसमाला ताब्यात घेतले.
पंचसमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्या पँटच्या आत कंबरेत ७०० रुपये किमतीचा एक हत्तीमार चाकू आढळून आला. पोलिसांनी तातडीने तो चाकू जप्त केला.
आरोपीला युनिट कार्यालयात आणून त्याचे गुन्हे अभिलेख तपासले असता, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. ०१ यांच्या आदेशान्वये (आदेश क्र. ०१/२०२४, दि. १२.११.२०२४) त्याला नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. हद्दपार असताना कोणत्याही परवानगीशिवाय शहरात येऊन मनाइ आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम १४२, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम ४, २५ शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी आरोपीला वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. पप्पु कादरी, पोहवा. रोशन तिवारी, विलास कोकाटे, अजय शुक्ला व पोलीस अंमलदार राहुल कुसरामे यांनी केली.



























































































































































































































































































































































































































































































































































