शेतमाल खरेदी करून ८३ लाखांची फसवणूक; वाडी पोलिसांत व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर:( दि. २५ ऑक्टों २०२५ ) शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या एफपीओ (FPO) योजनेंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीची आणि इतर दलालांची मिळून तब्बल ८३ लाख १३ हजार १२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन हयग्रीव राव (४८, रा. मुंजे चौक, हल्दीराम हॉटेलमागे, सीताबर्डी, नागपूर) असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे.
फिर्यादी सचिन सुरेशराव सोमनकर (३८, रा. सावळी बीबी, कान्होलीबारा, ता. हिंगणा, जि. नागपूर) हे 'कान्होलीबारा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. आरोपी सुदर्शन राव याने मेसर्स वरुण एंटरप्रायझेस, वाडीच्या माध्यमातून १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ते २५ मे २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेदरम्यान फिर्यादीच्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर शेतमाल खरेदी केला होता.
या व्यवहारात तांदूळ ५२३ पोती (प्रत्येकी ३० किलो), तूर ७५,३१५ किलो, चना १७,२६५ किलो या सर्व शेतमाळाची एकूण किंमत ७८ लाख ९३ हजार ७५४ रुपये झाली होती. त्यापैकी आरोपीने कंपनीला केवळ ३५ लाख ५५ हजार ३८० रुपयांचे पेमेंट केले. उर्वरित ४३ लाख ३८ हजार ३७४ रुपयांचे पेमेंट न करता त्याने कंपनीची व शेतकऱ्यांची फसवणूक केली.
तपासात समोर आले की, आरोपीने केवळ कान्होलीबारा कंपनीच नव्हे, तर इतर पाच ग्रामीण व शहरी भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे दलाल आणि कंपन्या यांच्याकडूनही शेतमाल घेतला. त्यांना कोणतीही रक्कम न देता ३९ लाख ७४ हजार ६३८ रुपयांची फसवणूक केली. अशा प्रकारे एकूण ८३ लाख १३ हजार १२ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
फिर्यादी सचिन सोमनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि अर्जाच्या चौकशीनंतर वाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोहउपनि.) संतोष शिरडोळे करीत आहेत.



























































































































































































































































































































































































































































































































































