गुमालकोंडा येथे एअरटेल मोबाईल टॉवर उभारणीसाठी तहसीलदारांना निवेदन
सिरोंचा, दि. 08 जुलै 2026 (तालुका प्रतिनिधी) – सिरोंचा तालुक्यातील गुमालकोंडा ग्रामपंचायत हद्दीत मोबाईल नेटवर्कची अत्यंत खराब परिस्थिती असल्याने एअरटेल मोबाईल टॉवर उभारणीस आवश्यक प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार, सिरोंचा यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे ग्रामस्थांना दैनंदिन संपर्क, ऑनलाइन शिक्षण, आरोग्य सेवा, बँकिंग व्यवहार, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच आपत्कालीन सेवांचा वापर करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे गुमालकोंडा येथे एअरटेलचा मोबाईल टॉवर उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायत गुमालकोंडा यांनी यापूर्वीच एअरटेल मोबाईल टॉवर उभारणीसाठी शिफारस व संमती दिली असून त्यासंदर्भातील कागदपत्रेही निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत. तहसीलदारांनी या प्रस्तावास सकारात्मक शिफारस करून मा. जिल्हाधिकारी, गडचिरोली तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्यामार्फत आवश्यक प्रशासकीय मान्यता व परवानग्या तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

































































































































































































































































































































































































































































































