हिंगणा तालुक्यात घोषित-अघोषित वीज भारनियमन तात्काळ बंद करा; अन्यथा महावितरणवर तीव्र आंदोलन छेडणार..
हिंगणा ( दि ३१ मे २०२६ ) सध्या उन्हाळ्याचा पारा कमालीचा वाढला असताना, हिंगणा तालुक्यात दिवस-रात्र सुरू असलेल्या घोषित आणि अघोषित वीज भारनियमनामुळे स्थानिक नागरिक अत्यंत हलाखीचे व त्रासाचे जीवन जगत आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांच्या नेतृत्वात महावितरणचे विभागीय कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारे यांना एका निवेदनाद्वारे गाऱ्हाणे मांडण्यात आले. तालुक्यातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास संतप्त नागरिकांसह महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिनेश बंग यांनी यावेळी प्रशासनाला दिला.
सध्या तालुक्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून अशा कडक उन्हाळ्यात दिवस-रात्र वारंवार आणि दीर्घकाळ वीज खंडित होत असल्यामुळे कुलर, पंखे आणि वातानुकूलित यंत्रांशिवाय जगणे मुश्कील झाले आहे. तासनतास लाईट जात असल्याने घरात प्रचंड उकाडा निर्माण होत असून, याचा सर्वाधिक फटका घरातील वयोवृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान बालकांना बसत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे वयोवृद्धांना आणि लहान बालकांना सतत कुलर किंवा पंख्यांची गरज भासते, परंतु वीज नसल्याने उष्माघातामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येसोबतच तालुक्यातील अनेक भागांत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वीज नसल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे ठप्प झाल्या असून, विहिरी आणि कूपनलिकांवरून पाणी उपसता येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
एकीकडे नागरिक दरमहा आपले वीजबिल नियमितपणे भरत असूनही त्यांना हक्काच्या विजेपासून वंचित ठेवले जात आहे आणि दुसरीकडे या त्रासाबाबत जेव्हा नागरिक स्थानिक वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधतात, तेव्हा त्यांच्याकडून उडवाउडवीची आणि अत्यंत बेजबाबदारपणाची उत्तरे दिली जातात. अनेकदा कर्मचारी फोन उचलत नाहीत किंवा फोन बंद करून ठेवतात, ज्यामुळे जनतेमध्ये महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र संताप व रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंगणा तालुक्यातील नागरिकांचा अंत न पाहता, प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तालुक्यातील वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा आणि नागरिकांना सौजन्याची वागणूक देण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी दिनेश बंग यांनी केली. जर पुढील काही दिवसांत वीज पुरवठ्यात योग्य सुधारणा झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हिंगणा तालुक्यातील संतप्त नागरिकांना सोबत घेऊन महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वानाडोंगरी शहराध्यक्ष हरिभाऊ रसाळ,गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व नगरसेवक न.प वानाडोंगरी अनुप डाखोळे , डिगडोह नगरपरिषदचे नगरसेवक सुरेश काळबांडे , माजी प स उपसभापती उमेशसिह राजपूत, माजी प स सदस्य सुनील बोंदाडे, नारायण डाखळे,रामशंकर गुप्ता, प्रभुदयाल बिसेन, अनिल तुरारे , बंटी भांगे, शैलेश राय, उपसरपंच सिराज शेटे , नारायण सातपुते, शेख रफीक, लक्ष्मण बोदलखंडे, पुरोषात्तम साकोरे, हिंगणा नगरपंचायतचे नगरसेवक दादाराव इटनकर ,नरेंद्र बर्वेकर, उपसरपंच दिनेश ढेंगरे , दिलीप उमाटे, रौनक खराबे, दीपावली कोहाड, सुनीता नागपुरे, मंगला ईटणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


























































































































































































































































































































































































































































