खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025 चे उदघाटन 7 नोव्हेंबर रोजी
★ स्वामी गोविंददेव गिरी महाराज व डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची विशेष उपस्थिती
★ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची नागपूरकरांना मिळणार मेजवानी
नागपूर ( १७ ऑक्टोंबर २०२५ ) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे दहावे पर्व आहे. वर्षागणिक त्याचे स्वरूप अधिक भव्य होत आहे. मागील वर्षी दोन कोटी लोकांनी प्रत्यक्ष व सोशल माध्यमांवर महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेत उच्चांक गाठला. दोन विक्रमांची नोंद करणारा हा महोत्सव देशातला सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून गणला जाऊ लागला आहे.
यावर्षी, खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 चे आयोजन येत्या, 7 ते 18 नोव्हेंबर दरम्यान हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात येणार आहे. सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात होणा-या या महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारदेखील या मंचावर आपली कला सादर करतील, पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात शुक्रवारी घोषणा केली.
मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णाजी खोपडे, प्रवीण दटके, अॅड. सुलेखाताई कुंभारे, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, डॉ. उपेंद्र कोठेकर, दयाशंकर तिवारी, यांच्यासह खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































