मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का?
★ तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप
तिवस ( दि. १० जुलैं २०२६ ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी, माता रुक्मिणीचे माहेरघर कौंडण्यपूर आणि संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव या धार्मिक स्थळांच्या पुनर्विकासासाठी आमदार राजेश वानखडे यांच्या प्रयत्नातून एकूण ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, कौंडण्यपूर येथील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भीमटेकडीच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जाते? असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी उपस्थित केला आहे.
तसेच तिवसा मतदारसंघात आजही विकासातील अस्पृश्यता कायम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सागर भवते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २०१४ ते २०१९ या पंचवार्षिक विकास आराखड्यात गुरुकुंज मोझरीच्या विकासासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी ७० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तसेच कौंडण्यपूरच्या विकासासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि त्या निधीतून विविध विकासकामेही पूर्ण करण्यात आली.
आता २०२६ मध्ये पुन्हा वलगाव, मोझरी आणि कौंडण्यपूर येथील देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती वृत्तपत्रांतून समोर आली आहे. मात्र, तिवसा मतदारसंघातील नया अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिभूमी आजही विकासापासून वंचित आहे. तसेच कौंडण्यपूर येथील भीमटेकडीच्या विकासासाठी २०२३ मध्ये केवळ २० लाख रुपयांचे सभागृह मंजूर करून बौद्ध समाजाची बोळवण करण्यात आली, असा आरोप भवते यांनी केला आहे.
सागर भवते म्हणाले की, माजी आमदार यशोमती ठाकूर आणि विद्यमान आमदार राजेश वानखडे यांनी प्रामुख्याने हिंदू धार्मिक स्थळांच्या विकासालाच प्राधान्य दिले असून, त्यामुळे तिवसा मतदारसंघात विकासातील विषमता आणि अस्पृश्यता कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिभूमी, नया अकोला आणि भीमटेकडीच्या विकासाच्या मागणीसाठी लवकरच पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही सागर भवते यांनी दिली.
लोकप्रतिनिधी हे केवळ एका धर्माचे किंवा समाजाचे नसून संपूर्ण मतदारसंघातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. तिवसा मतदारसंघात मात्र हिंदू धार्मिक स्थळांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असताना बौद्ध समाजाच्या श्रद्धास्थानांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार अन्यायकारक असून लोकप्रतिनिधींच्या विकासकामांत समानता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये प्रतिबिंबित झाली पाहिजेत, अशी अपेक्षा सागर भवते यांनी व्यक्त केली.

































































































































































































































































































































































































































































































