दुबई येथे महाबिज 2026 यशस्वीरीत्या संपन्न
★ जागतिक व्यावसायिक सहकार्यांना नवी दिशा!*
दुबई, यूएई: (दि. 6 फेब्रु.2026 ) जीएमबीएफ ग्लोबल (गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम) यांच्या वतीने आयोजित ९ वी महाबिज 2026 आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद नुकतीच दुबई येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. २५ पेक्षा अधिक देशांतील ८०० हून अधिक प्रतिनिधींच्या सहभागाने महाबिज ने पुन्हा एकदा जागतिक नेटवर्किंग, ज्ञानविनिमय आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय सहकार्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून आपले स्थान अधोरेखित केले.
या परिषदेत नेतृत्व, धोरण, तंत्रज्ञान, वित्त, ब्रँडिंग आणि जागतिक विस्तार या विषयांवर निवडक सादरीकरणे व परिसंवाद आयोजित करण्यात आले. उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना प्रत्यक्ष उपयोगी ठरणाऱ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
भारताचे सुप्रसिद्ध मेंटल कंडिशनिंग व पीक परफॉर्मन्स कोच डॉ. स्वरूप सवनूर यांनी मनोवृत्ती, एकाग्रता आणि भावनिक संतुलन यावर प्रेरणादायी सत्र घेतले. आजच्या स्पर्धात्मक व उच्च-दबावाच्या व्यावसायिक वातावरणात मानसिक शिस्त ही नेतृत्व व उद्योजकीय यशासाठी किती महत्त्वाची आहे, यावर त्यांनी भर दिला.
परिषदेतील अत्यंत अपेक्षित संपर्क ते संपर्क या सत्रात आर एम सी पी एल चे संस्थापक व लाँच कॅपिटल चे जनरल पार्टनर गिरीश टिळक यांनी सहभाग घेतला. व्यवहारिक ओळखीपेक्षा विश्वास, नातेसंबंध आणि दीर्घकालीन बांधिलकी यावर आधारित व्यवसायच टिकाऊ परिणाम देतो, असे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेणाऱ्या प्रतिनिधींना त्यांचे विचार विशेष भावले.
तंत्रज्ञान व परिवर्तन या विषयावर फहेद बिझ्झारी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व्यवसायात सुरक्षित, संरचित व शिस्तबद्ध पद्धतीने कशी स्वीकारावी यावर मार्गदर्शन केले. संस्थात्मक एआय साक्षरता व एकात्मिक कार्यप्रणालीमुळे उत्पादकता आणि धोरणात्मक स्पष्टता कशी वाढू शकते, हे त्यांनी अधोरेखित केले.
आंतरराष्ट्रीय कीनोट वक्त्या व व्हिजिबिलिटी स्ट्रॅटेजिस्ट रेइम एल हुनि यांनी नेतृत्व व ब्रँडिंग या विषयावर भाष्य केले. दृश्यमानता ही आत्मप्रचार नसून विश्वास, विश्वासार्हता आणि संधी निर्माण करण्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला “Africa Rising” परिसंवाद आफ्रिकेला तात्काळ आणि आशादायी व्यावसायिक आरसा दाखविणारा ठरला. व्यापार, उत्पादन, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्रातील संधींसह बाजारप्रवेश धोरणे, भागीदारी आणि नियामक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. आफ्रिकेत व्यवसाय विस्तार इच्छिणाऱ्या प्रतिनिधींमध्ये या सत्रानंतर मोठी उत्सुकता दिसून आली.
कार्यक्रमात वक्ते, पॅनेलिस्ट्स आणि योगदान देणाऱ्यांचा औपचारिक सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला. Link Middle East च्या संस्थापक व GMBF च्या गार्डियन श्रुती गोखले यांचा भारत व यूएईमधील सामाजिक उपक्रम आणि जागतिक व्यवसाय जोडणीसाठी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
केदार लेले आणि प्रशांत सुतार यांसारख्या मान्यवर पॅनेलिस्ट्सनी यशस्वी जागतिक ब्रँड उभारणीसाठी गुणवत्ता, मूल्ये, बाजारजाणीव आणि सतत नवोन्मेष या बाबी अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. आर्थिक नियोजन तज्ज्ञ श्री. गरुड आणि श्री. बिरांची यांनी बदलत्या आर्थिक परिस्थितीत जागतिक ट्रेंड्सशी सुसंगत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
MahaBiz 2026 ला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (MACCIA) यांचा पाठिंबा लाभला. MACCIA चे माजी अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने MahaBiz मध्ये सहभाग घेतला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवसाय संवाद प्रत्यक्ष अनुभवला. याशिवाय Saturday Club चा देखील MahaBiz 2026 ला सक्रिय पाठिंबा लाभला. श्री. अशोक दुगाडे यांच्या नेतृत्वाखाली Saturday Club च्या प्रतिनिधीमंडळाने या परिषदेचे साक्षीदार बनत सहभाग नोंदवला.
परिषदेतील अनेक प्रतिनिधींनी MahaBiz 2026 मुळे नवीन सहकार्य, भागीदाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांची सुरुवात झाल्याचे नमूद केले. नेटवर्किंगला प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतरित करणे, हे MahaBiz चे मूळ तत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाबीज २०२६ मध्ये उपयुक्त माहितीपरविविध परिसंवाद संपन्न त्यात विवेक कोल्हटकर यांसह डॉ. सत्या मेनन, स्वप्नील गीते, आर्किटेक्ट अतुल म्हात्रे आणि शरद म्हस्के यांसारख्या दिग्गज मान्यवरांचाही सहभाग होता.
समारोप करताना GMBF Global चे अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर म्हणाले,
“MahaBiz म्हणजे विश्वास, नातेसंबंध आणि सामूहिक प्रगती. जेव्हा जगभरातील लोक खुलेपणाने आणि विशिष्ट उद्देशाने एकत्र येतात, तेव्हा सहकार्य आपोआप घडते. हाच MahaBiz चा खरा यशस्वीपणा आहे.”
आशावादी वातावरणात MahaBiz 2026 चा समारोप झाला असून, भारत, यूएई, आफ्रिका आणि जागतिक व्यावसायिक समुदाय यांच्यातील दुवा म्हणून GMBF Global ची भूमिका अधिक बळकट झाली आहे.




























































































































































































































































































































































































































