परीक्षार्थी न होता गुणवंत विद्यार्थी व्हा; प्रा. कोमल ठाकरे यांचे प्रतिपादन
★ नेहरू विद्यालय व स्व. देवकीबाई बंग विद्यालयाचा दहावी-बारावीच्या विध्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न
हिंगणा ( दि. ३ फेब्रु २०२६ ) शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असून त्यातूनच आपल्या अस्तित्वाचे दर्शन घडते. शिक्षणातूनच माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, मात्र आजच्या काळात सोयी-सुविधा उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची ओढ कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. आजचा विद्यार्थी हा परीक्षार्थी होत चालला आहे, पण समाजात वावरताना माणसाची ओळख त्याच्या गुणपत्रिकेतील मार्कांवरून नाही तर त्याच्या अंगी असलेल्या गुणवत्तेवरून होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी न राहता गुणवंत व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. कोमल ठाकरे यांनी केले.
संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे आयोजित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि स्व. देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष अरुणा बंगहोत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य नितीन तुपेकर, मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, प्रा. कैलास पांडे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. ठाकरे म्हणाले की, पुस्तके माणसाचा आतील आवाज जागा करतात. वाचनाने माणूस विनम्र होतो, कारण ज्ञानी व्यक्ती नेहमीच विनम्र असते. आज मोबाईलचा अतिवापर मेंदूसाठी घातक ठरत असून, त्याचा उपयोग केवळ गरजेपुरता आणि अभ्यासासाठीच केला पाहिजे. जर मोबाईलचा उपयोग केवळ वेळ घालवण्यासाठी केला तर पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. परिश्रमात सातत्य ठेवले तरच आयुष्यात यशस्वी होता येते, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा दिला, तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना निरोप दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शशिकांत मोहिते यांनी केले, सूत्रसंचालन आनंद महाले यांनी केले तर आभार इशानी मित्रा यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.




























































































































































































































































































































































































































