जलसंवाद आणि जलक्रांती परिषद १७ आणि १८ मे रोजी
★ पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजन
नागपूर - ( दि. १० में २०२६ ) पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था गेल्या २५ वर्षांपासून जलसंधारणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. संस्थेने उभारलेल्या तामसवाडा मॉडेल ची दखल आज देशभर घेतली जात आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. १७ मे रोजी नागपूर जलसंवाद-२०२६ आणि १८ मे रोजी जलक्रांती परिषद अशा दोन टप्प्यात हा रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये देशभरातील दिग्गज जलतज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोबतच आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार उमेश यावलकर, पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी जामदार, सचिव माधव कोटस्थाने, अनिल सांबरे, सुमंत पुणतांबेकर, मनोहरराव कुंभारे, सचिन कुळकर्णी, सुधीर दिवे, नितीन कुळकर्णी यांची उपस्थिती होती.
रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, रविवार १७ मे रोजी दुपारी ४:०० वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूर जलसंवाद २०२६ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय’ या मुख्य विषयावर यावेळी सखोल मंथन केले जाणार आहे. विदर्भातील पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्यांवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने हा राष्ट्रीय स्तरावरील संवाद आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी असतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी (डेहराडून), पद्मश्री उमाशंकरजी पांडे (चित्रकूट), पद्मश्री सेठपाल सिंग (सहारनपूर) हे दिग्गज उपस्थित राहून आपले मार्गदर्शन करतील. तसेच, केशोब कृष्ण छत्रधारा (आसाम), संजय कश्यप (सेंटर फॉर वॉटर पीस), जलतज्ज्ञ श्रीमती स्वेडेविनो नात्सो (नागालँड) आणि राज्याचे राज्यमंत्री ना. ॲड. आशिष जयस्वाल व ना. डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, सोमवार १८ मे रोजी सकाळी १०:०० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जलक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला जाणार असून, विदर्भातील तामसवाडा पॅटर्न सारख्या यशस्वी जलसंधारण प्रयोगांवर चर्चा होईल.
या परिषदेला विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेते आणि पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, आणि सचिव मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे. जलक्रांती परिषदेसाठी विदर्भातील शेतकरी व सरपंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
१८ मे रोजी मुख्य कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी २.३० वाजता जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरण या विषयांवर सखोल चिंतन होईल. तसेच पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेने गेल्या अडीच दशकांत केलेल्या कार्यावर चर्चा होईल. या समृद्ध जल-अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्लदत्त जामदार आणि सचिव माधव कोटस्थाने यांनी केले आहे.
या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने जलपर्व', जलक्रांती, कृषिकल्याण आणि कॉरिडॉर्स ऑफ वॉटर सिक्योरिटी या महत्त्वपूर्ण पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते केले जाईल.


























































































































































































































































































































































































































































