महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था; ३६५ दिवस एक परिवार एक पुष्पहार अभियानावर नागरिकांची नाराजी
★ दोन तास उशिरा सुरू झालेल्या कार्यक्रमाला अनेक आमंत्रीत मान्यवरांनी फिरवली पाठ
नागपूर: ( दि. ९ जुन २०२६ ) उत्तर नागपुरातील इंदोरा चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची वर्षभर होणारी दुरवस्था आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष अखेर समोर आले आहे. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी व्यतिरिक्त इतर दिवशी या पुतळ्यांकडे कोणीही फिरकत नसल्याने, परिसरात कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. हीच दुरवस्था लपवण्यासाठी आता '३६५ दिवस एक परिवार एक पुष्पहार' अभियानाचा घाट घातला जात असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.
७ जून २०२३ रोजी माजी नगरसेविका ममता सहारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या अभियानाचा प्रारंभ तर करण्यात आला होता, मात्र त्यानंतर या पुतळ्याकडे कुणी फिरकुनही बघितले नाही. ३६५ दिवस एक परिवार एक पुष्पहार' अभियानावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
★ अभियानाबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली नाराजी:
प्रशासकीय अपयश लपवण्याचा प्रयत्न: पुतळा परिसराची दैनंदिन स्वच्छता करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, प्रशासन आपली जबाबदारी झटकत असून, आता स्वच्छतेचे ओझेही सर्वसामान्य कुटुंबांवर टाकले जात असल्याचा आरोप होत आहे.
■ केवळ कार्यक्रमांपुरतीच गर्दी:
संविधान चौकानंतर इंदोरा चौकात हे अभियान सुरू करण्यात आले होते खरे, मात्र उद्घाटन प्रसंगी केवळ माजी नगरसेविका ममता सहारे, सुमन कानेकर, मनिषा भगत, रेखा पाटील, राजू रामटेके आणि इतर काही मोजके कार्यकर्तेच उपस्थित होते. अशा मोहिमांमध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग केवळ नावापुरताच उरतो, अशी टीका होत आहे.
◆ विचारांपेक्षा उपचारांवरच भर:
डॉ. बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी दर रविवारी वक्त्यांना बोलावून मार्गदर्शन करण्याचे आश्वासन समितीचे अध्यक्ष भदन्त हर्षबोधी यांनी दिले आहे. नुकतेच ७ जुन २०२६ रोजी संविधान चौकात समितीचा ४ था वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. दोन तास उशिरा सुरू झालेल्या या कार्यक्रमाला अनेक आमंत्रीत मान्यवरांनी पाठ फिरवली. मात्र, प्रत्यक्षात अशा व्याख्यानांना तरुण पिढी पाठ फिरवताना दिसते. निव्वळ हारतुरे घालण्यापेक्षा बाबासाहेबांचे शैक्षणिक आणि आर्थिक विचार अमलात आणण्यात हे अभियान अपयशी ठरत असल्याची खंत सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे.
● थोडक्यात काय तर...
ज्या पुतळ्यांची देखभाल पालिकेने करणे अपेक्षित आहे, तिथे जनतेकडून दररोज हार घालवून घेण्याची योजना आखली जात आहे. वर्षभराच्या या संकल्पामुळे पुतळा परिसरात रोज कचरा वाढण्याची भीती असून, केवळ राजकीय प्रसिद्धीसाठीच अशा मोहिमांचा वापर केला जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

































































































































































































































































































































































































































































































