शासनाची जमीन विकून फसवणुक करणाऱ्या भुमाफियांना अटक
★ आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर: ( दि. १९ ऑगस्ट २०२५ ) मौजा भांडेवाडी येथील पवनशक्तीनगर खसरा नंबर ११६ / ११७ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या मालकीच्या जागेवर भूखंड टाकून मासिक किस्तांवर प्लाट विकून साठ लोकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफीया जफर उल्ला खॉन हफिजउलला खॉन, शादाब खान वल्द हिदायतुल्लाह खान, दोन्ही रा. बंगाली पंजा, अब्बुमियाँ हाउस, पिली स्कुल जवळ, ईतवारी, पो.स्टे. तहसिल, नागपूर, वकील अहेमद अब्दुल करीम शेख, रा. वार्ड नं. ०२, अडयाळ, जामा मस्जीद जवळ, ता. पवणी जि. भंडारा, यांना आज आर्थिक गुन्हे शाखा पोलीसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहिती नुसार असे की, फिर्यादी शाहनवाज आलम हकिम अंसारी रा. नागपुर यांनी सन २०१० मध्ये आरोपीतांकडुन मौजा भांडेवाडी शिट क्रमांक ५१, ५२, ४४ सिटी सर्वे क्रमांक १०१३, १०२६ खसरा नं. ११६/१, ११७/२ मधील प्लॉट नं. १६ विकत घेतला होता. त्यानंतर सन २०१७ मध्ये शेतमालक आरोपीने शाहनवाज आलम हकिम अंसारी यांना सांगीतले की, मोजनीमध्ये त्यांची जमीन जास्त निघाली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीकडुन त्याच जमीनीतील प्लॉ.नं. २२८ हा सुध्दा विकत घेतला. त्याच जमीनीवरील ले-आउट मधील सर्व प्लॉट विकल्या गेले व तेथे लोकांनी आपले घर बांधलेले असुन आरोपींनी फिर्यादी यांना सांगीतले की, शेतजमीनीच्या मोजनीमध्ये आणखी ४४ प्लॉट जास्तीचे निघाले आहे. फिर्यादी यांनी परत प्लॉट नं. १३/ए व १४/ए हे दोन प्लॉट बुक केले व त्याचे पैसे सुध्दा दिले. त्यानंतर आरोपी हे फिर्यादी यांचे दुकानात आले व त्यांनी सांगीतले की, अमानउल्ला खान वल्द असदउल्ला खान कडुन ५ एकर शेती विकत घेतली असुन चांदमारी रोडवर तीन प्लॉट खाली असल्याचे सांगीतले. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा मित्र शहजादा अंसारी यांनी प्लॉट नं. १, ५ व १४० चा खरेदी करारनामा रू. १,०९,२९,००० -केला. त्यापैकी फिर्यादीने आरोपीतांना चेकद्वारे व रोख स्वरूपात ५२,७१,००० रूपये दिले.
६ जानेवारी २०२५ रोजी एन.आय.टी. चे अतिक्रमण काढणारे पथक घटनास्थळी आले व त्यांनी सांगीतले की, ही जागा एन.आय.टी. ची असुन तुम्ही अनधिकृतपणे अतिक्रमण करून राहत आहात. त्यामुळे फिर्यादी यांनी एन.आय.टी. कडुन माहिती काढली असता सदर जमीन ही एन.आय.टी. ने १९६१ मध्ये सिवरेज अॅन्ड डिस्पोजल प्लॉन्ट व कचरा संकलन करिता राखीव ठेवल्याचे समजले.
त्या जमीनीचा मोबदला आरोपी तसेच शेतजमीनीचे मुळ मालक व इतर यांना रु. १८,६८८ दिल्याचे समजले. त्याचप्रमाणे फिर्यादी यांनी प्लॉ.नं. १३/ए व १४/ए या प्लॉटबाबत माहिती काढली असता त्या प्लॉटची रजिस्ट्री साहील इकबाल शब्बीर शेख रा. रजा जामा मस्जीद जवळ, गरीब नवाज चौक, खरबी नागपूर यांचे नावाने आरोपी) जफरूल्लाह खान याने १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी करून दिली असल्याचे दिसुन आले.
अशाप्रकारे खसरा नं. ११६/१, ११७/१, ११७/२ ही जमीन शासनाची असल्याची व त्याचा मोबादला यापुर्वीच आरोपीतांनी घेतल्याची जाणीव असतांना सुध्दा आरोपीतांनी संगणमत करून खसरा नं. ११६/१, ११७/२ आणि साई रत्न डेव्हलपर्स यांनी खसरा नं. ११७/१ मध्ये प्लॉट पाडुन फिर्यादी व इतर लोकांना त्याचे विकीपत्र लावुन देवून तसेच नासुप्र. नागपूर व मनपा. नागपूरचे मालकिचा खसरा क्र. ११६/२, ११६/३ चे बनावट सातबारा तयार करून तो सातबारा खरा असल्याचे भासवून १,३४,९९,२०० रुपयाची आर्थिक फसवणुक केल्यावरून फिर्यादी यांचे फिर्यादीवरून आरोपी जफर उल्ला खॉन हफिजउल्ला खॉन, शादाब खान वल्द हिदायतुल्लाह खान दोन्ही रा. नागपूर व वकील अहेमद अब्दुल करीम शेख, रा. ता. पवणी जि. भंडारा यांचे विरूध्द १६ एप्रिल २०२५ रोजी पोलीस ठाणे वाठोडा, नागपूर शहर अप क. १६२/२०२५ कलम ४२०,४६७, ४६८, ४७१, ४७४, १२० (ब) भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपी यांना रितसर ताब्यात घेवुन अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे पोहवा शरद कोकाटे, विजय गुरपुडे, उपेंद्र तायडे, सुषमाकर जांभुळकर, इंशांक आटे पोशि योगेश निघोट यांनी केली आहे.




























































































































































































































































































































































































































