विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल; आ. संदीप जोशी
नागपूर; ( दि. ७ मार्च २०२६ ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला आजचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि भविष्योन्मुख असा आहे. ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ देताना तंत्रज्ञानाचा (Technology) प्रभावी वापर, पायाभूत सुविधांवर भर आणि रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पदभरती ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता यामुळे शेती क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठा आधार ठरेल.
विदर्भाच्या दृष्टीने रामटेक येथे फिल्म सिटी, बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम तसेच नागपूरमध्ये आरोग्य सुविधांमध्ये होणारी गुंतवणूक हे निर्णय या भागाच्या विकासाला नवी गती देणारे आहेत. शेती, उद्योग, तंत्रज्ञान, रोजगार आणि सामाजिक कल्याण यांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल.




























































































































































































































































































































































































































