अमरावती मनपा निकालानंतर भाजपचा महापौर विकासासाठी सर्वांना सोबत येण्याचे आवाहन
संजय राऊत यांनी २०४७ पर्यंत मंत्रालयात बसायचे स्वप्न पाहू नये.- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती ( दि. २५ जाने. २०२६ ) भारतीय जनता पक्षाच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी आमचाच सर्वात मोठा पक्ष आहे.त्यामुळे महापौर हा भाजपाचा होणार असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखरब बावनकुळे यांनी दिली.
महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महानगरपालिका निवडणूक निकाल, महापौरपद, युती, तसेच विरोधकांच्या टीकेवर सडेतोड भूमिका मांडली.
अमरावतीकरांनी भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल बावनकुळे यांनी नागरिकांचे मनापासून आभार मानले. आमच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्या तरी भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे. जागा का कमी झाल्या याचे चिंतन आणि तपास करण्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महापौरपदाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, भाजपचा महापौरच होईल. महापौर निवडीसाठी सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल आणि भाजपला बहुमत कसे मिळेल याचा निर्णय घेतला जाईल. “ज्यांना भाजपच्या महापौराला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांचे स्वागत आहे. ज्यांची मर्जी आहे ते सोबत येतील, ज्यांची नाही ते येणार नाहीत; मात्र विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी विनंती आम्ही करणार आहोत,” असे ते म्हणाले.
भाजपचा महापौर असला तर केंद्र आणि राज्य सरकारकडून अमरावतीला मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमरावतीचा महापौर कोण होणार, याचा निर्णय राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोअर कमिटी घेईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांच्या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीतील जे पक्ष भाजपसोबत येतील त्यांना सोबत घेतले जाईल आणि त्यासाठी विनंतीही केली जाईल.
बिहार भवनच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विविध समाजांसाठी राज्यांमध्ये भवन उभारण्यात काहीही गैर नाही आणि समाज भवन उभारणीला कोणीही विरोध करू नये.
अचलपूरच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, भाजपने कोणतीही युती केली नसून समित्या निवडल्या आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “संजय राऊत यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसण्याचे स्वप्न पाहू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री २०४७ पर्यंत एनडीए–भाजप महायुतीचेच असतील आणि ते मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच कार्यरत राहतील.”
उद्धव ठाकरे यांच्या मोदी–शहा टीकेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत यश मिळेल असे त्यांना वाटले होते, पण अपयश आल्याने त्यांच्यात ‘फ्रस्ट्रेशन’ आहे. त्यामुळेच असे वक्तव्य त्यांनी केले असावे. एकूणच अमरावतीच्या विकासासाठी भाजप नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यावे असेही बावनकुळे म्हणाले.




























































































































































































































































































































































































































