स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका बघता भाजप मध्ये मोठे फेरबदल
★ माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी
निवडणुका लक्षात घेता भाजपने नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यात नेतृत्वबदल केला आहे. शहराध्यक्ष बंटी कुकडे यांचा कार्यकाळ संपायला अवधी असतानाच भाजपने माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे, तर जिल्हा परिषदेचा किल्ला सर करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच दोन जिल्हाध्यक्षांचा प्रयोग केला आहे.
काटोल आणि रामटेक असे दोन विभाग करून तेथे अनुक्रमे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर कुंभारे आणि माजी सभापती आनंदराव राऊत यांना जिल्हाध्यक्ष केले आहे. भाजपच्या या खेळीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढविल्या गेली होती. मात्र, त्यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू होता. अनेक तरुण नावांवरदेखील भाजपकडून विचार झाला. मात्र, मनपा निवडणुकीत भाजपची नस जाणणारा व शहराची चांगली ओळख असलेल्यालाच शहराध्यक्ष करण्यात यावे, असे पक्षनेत्यांचे मत पडले. त्यातूनच तिवारी यांच्या नावावर एकमत झाले.




























































































































































































































































































































































































































