पिटेसूर (रिठी) येथील भूखंडांवर बेकायदेशीर अतिक्रमण व तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल
★ प्लॉटधारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक; सीआयडी तपासाची मागणी
नागपूर: ( दि. १० जुलैं २०२६ ) खसरा, सर्वे क्र. ४२, मौजा पिटेसूर (रिठी) येथील भूखंडांवर बेकायदेशीर अतिक्रमण करून तोडफोड केल्याप्रकरणी आणि प्लॉटधारकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभाग किंवा विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी आदेश मेंढे व स्थानिक रहिवासी व प्लॉटधारकांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जमिनीचे मूळ मालक हाजी बशीर हाजी सत्तार अशारफी यांनी सन २००१ मध्ये या जमिनीचे भूखंड (प्लॉट्स) पाडून त्यांची विक्री केली होती. सन २००२ पासून खरेदीखत, मुखत्यारपत्र (पावर ऑफ अटर्नी) आणि ताबा पत्राच्या आधारे अनेक नागरिकांनी येथे आपले भूखंड खरेदी केले आणि तेथे तात्पुरत्या झोपड्या व तारांचे कुंपण उभारून स्थानिक करांचा (ग्रामपंचायत गोधनी) भरणाही केला.
★ गुंठेवारीच्या प्रक्रियेत फसवणूक उघड
सन २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या गुंठेवारी योजने अंतर्गत या प्लॉट्सच्या नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू असताना, ७/१२ च्या उताऱ्यावरून एक धक्कादायक बाब समोर आली. मूळ जमीन मालक हाजी बशीर यांनी सर्व प्लॉटधारकांची फसवणूक करत ही संपूर्ण जमीन बेकायदेशीरपणे त्यांचा मुलगा हाजी जुब्बेर हाजी बशीर अशारफी याच्या नावावर हस्तांतरित केली. एवढेच नव्हे तर, त्यांनी एकाच प्लॉटची विक्री वेगवेगळ्या व्यक्तींना केल्याचेही उघडकीस आले. या गंभीर प्रकारानंतर प्लॉटधारकांनी नागपूर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार २२ जानेवारी २०२६ रोजी आरोपींविरुद्ध बीएनएस कलम ४२०, ४०६ आणि ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
★ रात्रीच्या वेळी तोडफोड आणि दहशत
तक्रारीनुसार, २७ जून २०२६ च्या रात्री आरोपी हाजी जुब्बेर आणि हाजी बशीर यांनी मिळून प्लॉटधारकांनी उभारलेल्या झोपड्या व तारांचे कुंपण तोडून नुकसान केले आणि जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच २८ जून रोजी सर्व प्लॉटधारकांनी घटनास्थळाला भेट देऊन गिट्टीखदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने स्वतः कुंपण आणि झोपड्या तोडल्याची कबुली दिली, परंतु त्यानंतरही पुढील ६-७ दिवस पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नाही.
★ प्लॉटधारकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव
या संथ कारवाईमुळे संतप्त झालेल्या प्लॉटधारकांनी पोलीस आयुक्त आणि डीवायएसपी (झोन-२, नागपूर) यांची भेट घेऊन दाद मागितली. उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातल्यानंतर, ७ जुलै २०२६ रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४(५) व ३२९(३) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्यात आला.
★ आरोपींना तात्काळ अटकेची मागणी
गुन्हा दाखल होऊनही दोन्ही मुख्य आरोपी अद्याप मोकाट फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी कांती शर्मा, प्रताप गोडाम, कमलेश चतुर्वेदी, आदेश मेंढे व इतर सर्व प्लॉटधारकांनी केली आहे. तसेच या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि सखोल तपासासाठी महाराष्ट्राचे माननीय गृहमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांनाही निवेदन सादर करण्याचा निर्णय सर्व प्लॉटधारकांनी व सामाजिक संघटनांनी मिळून घेतला आहे.

































































































































































































































































































































































































































































































