माध्यमांनी जनतेचे कायदेशीर वकील म्हणून काम केले पाहिजे; विनोदजी रापतवार
जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र यांच्या विद्यमाने पत्रकार कार्यशाळा – २०२६ उत्साहात संपन्न
नागपूर प्रतिनिधी : ( दि. १८ जुलैं २०२६ ) पत्रकारिता ही मधाच्या पोळ्यासारखी असते; त्यामध्ये गोडवाही असतो आणि काटेही असतात. माध्यमांनी जनतेचे कायदेशीर वकील म्हणून काम केले पाहिजे. पत्रकारांनी जबाबदारीने, कायद्याचे भान ठेवून आणि लोकहिताला प्राधान्य देत कार्य करावे, असे प्रतिपादन नागपूर जिल्हा माहिती अधिकारी, विनोद रापतवार यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमे आणि कायद्याची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना आज येथे केले.
ते जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र यांच्या विद्यमाने पत्रकारांचे ज्ञान, कौशल्य आणि व्यावसायिक क्षमता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने एकदिवसीय जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा – २०२६ चे आयोजन आमदार निवास, नागपूर येथे घेण्यात आले. तेथे ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त पोलीस महासंचालक तथा कमांडंट जनरल, गृहरक्षक दलाचे डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी, विनोद रापतवार,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मास कम्युनिकेशन अँड मीडिया सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. मोइज़ मन्नान हक, जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र साळे, शामली निंबाळकर, जेष्ठ पत्रकार पराग जोशी, बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. प्रकाशजी जयसवाल, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, कार्याध्यक्ष युवराज देवरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोइज़ मन्नान हक यांनी डिजिटल पत्रकारिता व सोशल मीडियाचे वाढते महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सतत अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी तिच्या दोन्ही बाजूंची पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत वातानुकूलित कार्यालयात बसून पत्रकारिता करता येत नाही; पत्रकाराने घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष वार्तांकन केले पाहिजे. त्यांनी देश-विदेशातील पत्रकारितेचे अनुभव कथन करत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारितेतील फरक स्पष्ट केला. पत्रकारितेत संयम, सातत्य आणि अद्ययावत ज्ञान ही यशाची त्रिसूत्री असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उपस्थित मान्यवरांनी बदलत्या काळातील पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकारांसमोरील वाढती आव्हाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कायदेशीर बाबी, डिजिटल माध्यमांचा प्रभाव तसेच समाजाप्रती पत्रकारांची जबाबदारी या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मान्यवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन मिलिंद इंगळे यांनी केले. तर आभार युवराज देवरे यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रतीक पांडे, विदर्भ विभागीय सचिव सचिन बैस, महिला अध्यक्षा शितल नंदनवार, नागपूर जिल्हाध्यक्ष संजय तिवारी, महासचिव राजेश शुक्ला, महासचिव रुपेश नागदेवे, आशिष पणत तसेच जन ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला जन ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष स्मिता नगराळे वर्धा जिल्हा,चंद्रपूरचेजिल्हाध्यक्ष गणेश लाजिवार, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष मिलिंद इंगळे, नागपूरचे उपाध्यक्ष सुनील मैदिले तसेच भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि नागपूर जिल्ह्यांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































































































































































































































































































































































































































































