महाराष्ट्र प्रदेश मारवाडी संमेलनाच्या अध्यक्षपदी महेश बंग यांची बिनविरोध निवड
★ अकोला येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकृत घोषणा
हिंगणा: ( दि. ९ ऑगस्ट २०२६ ) मारवाडी समाजात अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश मारवाडी संमेलनाच्या प्रादेशिक अध्यक्षपदी महेश रमेशचंद्र बंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अकोला येथे मावळते अध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महाराष्ट्र मारवाडी प्रादेशिक संमेलनाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी जयप्रकाश मुंदडा यांनी महेश बंग यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.
या प्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी आमदार गोपीकिशन बाजेरिया, अकोला महानगरपालिकेचे माजी महापौर विजय अग्रवाल, मारवाडी संमेलनाचे सर्वेसर्वा वीरेंद्र धोका, कागलीवालजी आणि सुरेश अग्रवाल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधतांना महेश बंग यांनी संमेलनाच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या व भाषणात ते म्हणाले की, संघटन हेच सर्वोपरी असून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट राहील. संपूर्ण महाराष्ट्रात मारवाडी संमेलनाचे मजबूत जाळे तयार करून सामाजिक एकोपा वाढवण्यावर भर दिला जाईल. समाजातील गोरगरीब, गरजू व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील. तरुणांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणून सामाजिक उपक्रमांना गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संतोष छाजड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शाम शर्मा यांनी मानले. या कार्यक्रमास भरत गुजर, मदन मालपाणी, गंगाबिसन काकर, उमेश पंचारिया, मनीष तारावाला, महेश भक्कड, राम नारायण गगराणी, सुदेश अट्टल, श्रीनिवास पांडे, संजय अग्रवाल, मनोज अग्रवाल, हेमंत शर्मा, मनोज चांडक, निलेश अग्रवाल, गोविंद राठी, केतन गुप्ता आणि रितिक अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले मारवाडी संमेलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































































































































































































































































































































































































































































