रक्ताने लिहीलेला लढा, अस्मितेचा सोहळा आणि एका नावाची कृतज्ञता!
( दिनेश घरडे )
नागपूर ( दि. ४ ऑगस्ट २०२६ ) काळाच्या महाकाय पटलावर काही लढाया अशा असतात, ज्या केवळ सत्तेसाठी किंवा हक्कासाठी लढल्या जात नाहीत, तर त्या मानवी सन्मान, समता आणि आत्मसन्मानासाठी लढल्या जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नावात दडलेला इतिहास हा केवळ अक्षरांचा समूह नाही; तो हजारो शोषितांच्या संघर्षाचा, हुतात्म्यांच्या रक्ताचा आणि एका प्रदीर्घ सामाजिक लढ्याचा धगधगाता इतिहास आहे. नामांतराच्या त्या १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील धग आठवली, की आजिबात अतिशयोक्ती वाटत नाही—
★ हा लढा नावाचा नव्हताच, तो मानवी मूल्यांच्या पुनरुत्थानाचा लढा होता.
मराठवाड्याच्या मातीत जेव्हा शिक्षणाची गंगा रुजली, तेव्हा त्या भूमीला एका मार्गदर्शकाची, एका युगपुरुषाची गरज होती. ज्या महामानवाने या देशातील शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजाला शासक व्हा असा संदेश दिला, ज्याने औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय उभारून शिक्षणाची दारे खुली केली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव या विद्यापीठाला मिळणे ही केवळ एक मागणी नव्हती; ती तर त्या भूमीची आपल्या जनकाप्रति असलेली एक कृतज्ञता होती.
परंतु, हा प्रवास सोपा नव्हता. नामांतराची घोषणा झाली आणि मराठवाड्याची शांतता ढवळून निघाली. रस्ते पेटले, घरे होरपळली, गावेच्या गावे सामाजिक संघर्षाच्या आगीत होरपळून निघाली. भावंडात दुरावा निर्माण झाला, मैत्रीच्या धाग्यांना तडे गेले. नामांतराच्या विरोधात आणि समर्थनात रस्त्यावर उतरलेले तरुण ही एकाच मातीची लेकरे होती, पण विचारसरणीच्या आणि गैरसमजाच्या भिंती इतक्या उंच झाल्या होत्या की संवादाचे पूल कोलमडून पडले.
★ ज्या लढ्यात अस्मितेचे उफान असते, तिथे रक्ताचे थेंब सांडतात, तेव्हाच इतिहासाला नवी दिशा मिळते.
या आंदोलनात ज्या नामंतराच्या हुतात्म्यांनी आपले प्राण पणाला लावले, ज्या आई-भगिनींनी या लढ्याची झळ सोसली, ज्यांच्या पाठीवर लाठ्यांचे वळ उठले, त्या प्रत्येकाचा त्याग आज या नावात जिवंत आहे. पोचराम कांबळे असोत वा इतर अनेक अज्ञात हुतात्मा... त्यांच्या बलिदानाने नामांतराच्या या लढ्याला एका पवित्र यज्ञाचे रूप दिले.
अखेर १४ जानेवारी १९९४ तो सोन्याचा दिवस उजाडला. 'विस्तारित नाव' म्हणून का होईना, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' ही पाटी लागली. पण ती केवळ एक लाकडी वा धातूची पाटी नव्हती; तो अन्यायाविरुद्ध न्यायाचा, विषमतेविरुद्ध समतेचा आणि बंधुभावाचा विजय होता. नामांतराचा तो क्षण म्हणजे अश्रू, आनंद आणि कृतज्ञतेचा एक अथांग कल्लोळ होता.
आज जेव्हा आपण त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवतो, तेव्हा केवळ वास्तू किंवा वर्ग दिसत नाहीत; तर तिथे त्या संघर्षाची स्पंदने जाणवतात. ते नाव आपल्याला रोज आठवण करून देते की, हे विद्यापीठ केवळ पदव्या देणारे कारखाने नाही, तर ते मानवी मूल्यांचे, सामाजिक क्रांतीचे आणि समतेचे मंदिर आहे.
आज नामांतर आंदोलनाला अनेक वर्षे उलटून गेली आहेत. जखमा भरल्या आहेत, पण वळ बाकी आहेत. हे वळ आपल्याला भूतकाळातील संघर्षाची आठवण करून देत असतानाच, भविष्यातील एकतेचा मार्गही दाखवतात. आजची तरुण पिढी जेव्हा या विद्यापीठात शिकते, तेव्हा त्यांनी हे कधीही विसरू नये की, ज्या नावाची पाटी आज तिथे दिमाखात झळकत आहे, ती पाटी मिळवण्यासाठी एका संपूर्ण पिढीने आपले आयुष्य पणाला लावले होते.
नामांतराचा हा इतिहास म्हणजे केवळ एक आंदोलन नाही, तर ती एका नव्या, प्रबुद्ध भारताची नांदी होती. त्या ऐतिहासिक संघर्षाला, त्यातील हुतात्म्यांना आणि समतेची मशाल तेवत ठेवणाऱ्या प्रत्येक सैनिकाला या अग्रलेखाच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम!

































































































































































































































































































































































































































































































