निर्मल नगरी ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा
नागपूर:( दि. २२ ऑगस्ट २०२६ ) वयाची ऐंशी वर्षे पूर्ण होणे म्हणजे केवळ आयुष्याचा एक टप्पा नव्हे, तर अनुभव, कर्तृत्व आणि जीवनमूल्यांनी समृद्ध झालेल्या प्रदीर्घ जीवनप्रवासाचा गौरवशाली अध्याय होय. याच भावनेतून निर्मल नगरी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ८० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात एस. बॅनर्जी, हेडाऊ, वाट, काकडे आणि श्रीमती पाठराबे यांचा सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दुनेदार, निवृत्त उपअभियंता रवि देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक अशोक काळे, मनोहर देवतारे आणि समाजसेविका बोबडे यांच्या हस्ते सन्मानित ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ पाथोडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनानुभवाचा आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सन्मानित ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त करताना या सन्मानामुळे मिळालेला आनंद आणि आपलेपणा मनोगतातून व्यक्त केला.
ज्येष्ठांचे अनुभव हे समाजासाठी चालते-बोलते विद्यापीठ असते. त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीतून मिळणारे संस्कार, संघर्ष आणि जीवनदृष्टी पुढील पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरतात. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ व्यक्तीचा गौरव नसून अनुभवाच्या समृद्ध परंपरेला केलेला नमन आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचा समारोप सुमधुर भावगीताने झाला. उपस्थितांच्या मनात आनंद, समाधान आणि आत्मीयतेची भावना निर्माण करणाऱ्या या सोहळ्याचे आभार उमेशचंद्र ठाकरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक पाचपोर, येनुरकर, मानकर तसेच निर्मल नगरी कंडोनियमच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

































































































































































































































































































































































































































































































