वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरास अटक, ३.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
★ पाचपावली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
नागपूर: ( दि. २ ऑक्टों २०२६ )
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला बेड्या ठोकण्यात पाचपावली पोलिसांच्या तपास पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आवळे नगर, टेकानाका येथे राहणारे नितीन भारत रंगारी, वय ३९ वर्षे यांनी आपली होंडा ॲक्टिव्हा ६ जी (क्र. MH 49 BP 3274, किंमत ३०,०००/- रु.) टेका नाका जवळील जॉली देशी दारूच्या दुकानासमोर लॉक करून पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिशान अब्दुल हफीज शेख, वय २५ वर्ष, रा. आसीनगर, गौसिया मशिदीजवळ, पाचपावली, याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी हा पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारने (क्र. MH 12 NX 0580) चोरी करण्यासाठी फिरायचा. चोरी केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तो त्या पांढऱ्या कारला काळा रंग देत असे. आरोपी कडून होंडा ॲक्टिव्हा ६ जी मोपेड (क्र. MH 49 BP 3274), होंडा ॲक्टिव्हा मोपेड (क्र. MH 31 EL 1842),. गुन्ह्यात वापरलेली टाटा इंडिका कार (क्र. MH 12 NX 0580) असा एकूण किंमत ३,०५,००० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही धडक कारवाई पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ चे राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त, लकडगंज विभाग शिवप्रसाद पारवे व वपोनि. विवेक पडधान यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सचिन भोंडे, पोहवा पवन भटकुर, राजेश कोकाटे, पोअं. ओमप्रकाश बुरडे, शंकर आगळे आणि मनोज चौधरी यांनी केली आहे.



























































































































































































































































































































































































































































































































































