प्लॉट विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक; आरोपीविरुद्ध नवीन कामठी पोलिसांत गुन्हा दाखल
कामठी ( दि. २ऑक्टों २०२६ ) प्लॉट खरेदी करण्याच्या बहाण्याने एका महिलेची ३ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार उषा राजेश गोखे, वय ४१ वर्ष, रा. घर नं. १९२, पाण्याच्या टाकीजवळ, कुंभारे कॉलनी, प्रफुल्ल खोब्रागडे यांचे घरी किरायाने, नागपूर यांना प्लॉट खरेदी करायचा होता. त्या दरम्यान त्यांची ओळख आरोपी नवाब मोहसिन विलायत खान, रा. गांधीबाग, नागपूर याच्याशी झाली.
दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ ते २६ जून २०२६ दरम्यान, आरोपीने मौजा आजनी येथील पहनं. १९, खसरा नं. ५३/१ ही जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे खोटे सांगितले. तसेच एम. के. इन्फ्रास्ट्रक्चर या नावाने त्या जमिनीवर ले-आऊट पाडून त्यातील प्लॉट विक्री करत असल्याचा बनावा रचून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
तक्रारदार महिलेने सदर ले-आऊटमधील प्लॉट क्र. १६ खरेदी करण्याची पसंती दर्शवली. आरोपीने जमिनीची मालकी नसतानाही खोटी कागदपत्रे आणि करारनामा तयार करून दिले. यादरम्यान फिर्यादीकडून ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण ३,३५,००० रुपये उकळले.
काही दिवसांनी फिर्यादीने प्लॉटची रजिस्ट्री करून मागितली असता आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. संशय आल्याने महिलेने आपले पैसे परत मागितले असता आरोपीने रक्कम परत करण्यास साफ नकार दिला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून व केलेल्या अर्जाच्या चौकशीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात पोउपनि. विनायक इंगळे यांनी आरोपी नवाब मोहसिन विलायत खान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




























































































































































































































































































































































































































































































































































