सोनेगाव (निपाणी) येथील श्रमिक नगरच्या अतिक्रमण धारकांना त्वरित मालकी हक्काचे पट्टे द्या; माजी मंत्री रमेशचंद्र बंग
★ राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हिंगणा ; ( दि. २६ सप्टेंबर २०२४ ) नागपूर ग्रामीण तालुक्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघात येत असलेल्या सोनेगाव निपाणी येथील श्रमिक नगर मधील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या ४०० अतिक्रमणधारकांना त्वरित मालकी हक्काचे पट्टे द्या अशी मागणी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नागपूर यांची भेट घेऊन केली.
नागपूर तालुक्यातील सोनेगाव निपाणी हे गाव हिंगणा एमआयडीसीला लागून असून या गावातील श्रमिक नगर भागात हिंगणा एमआयडीसी मध्ये काम करणारे कामगार मागील ४० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून वास्तव्य करत आहेत. त्या चारशे कामगारांना ते राहत असलेल्या घरांचे मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे.
मागील ४० वर्षापासून येथील नागरिक सातत्याने घरांच्या मालकी हक्कांच्या पट्ट्यांकरिता प्रशासन स्तरावर पाठपुरवठा करीत आहेत. त्याकरिता आंदोलने सुद्धा तेथील स्थानिक रहिवासी यांनी केली आहेत. पट्टे वितरणाची प्रक्रिया प्रशासन स्तरावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नाहारकत प्रमाणपत्र अभावी बारगडली आहे. तेव्हा सदर रहिवाशांना ते राहत असलेल्या सोनेगाव निपाणी येथील श्रमिक नगर मधील ४०० घरांचे मालकी हक्काचे पट्टे त्वरित देण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष शासन,प्रशासना विरोधात एल्गार पुकारून तीव्र आंदोलन उभे करेल असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यासह सोनेगाव निपाणी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कृष्णा सरीन, पराग शाहू, कुवरलाल मस्के, नेत्राम राऊत, भूषण भारद्वाज, विष्णू पांडे, किशोर शिरसागर, हेमाबाई यादव, रामप्रकाश रामटेके, मंगू बैठवार, ईश्वर दशरिया, कमलेश बैठवार, राजेश बोहणे आदींचा समावेश आहे.




























































































































































































































































































































































































































