स्व. भानुताई गडकरी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण रविवारी
★ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपूर ( दि. २५ जुलैं २०२६ )कमाल चौक लष्करीबाग येथील स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण रविवार, दि. २७ जुलै रोजी होणार आहे.
या केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची विशेष उपस्थिती असेल. लष्करीबाग येथील कमाल चौक परिसरात रविवार २७ जुलैला दुपारी १२.३० वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी बेंगलुरू येथील महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी पुज्य भंते आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष राघवेंद्र स्वामी, महाराष्ट्राच्या माजी मंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा आणि भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची प्रमुख उपस्थिती असेल.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला येत असलेल्या या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, एक्स-रे, सिटी स्कॅन, एमआरआय, डायलिसिस या सुविधा उपलब्ध असणार आहेत. आजवर हार्ट ऑपरेशन्स, कर्करोग उपचार, लिव्हर व किडनी ट्रान्सप्लान्ट, थॅलेसिमिया आदींच्या उपचारासाठी हजारो नागरिकांना स्व. भानुताई गडकरी ट्रस्टच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आले आहे. यासोबतच कर्ण, दंत व नेत्र तपासणी शिबिरांचाही लाखो नागरिकांनी लाभ घेतला आहे. डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या क्षेत्रात संस्था एक मोठे पाऊल टाकत आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.




























































































































































































































































































































































































































