एनआयटीच्या गुंठेवारी विभागातील कारभाराची चौकशी करण्याची मागणी
अन्याय अत्याचार प्रतिकार संघटनेची मागणी
नागपूर: ( दि. २६ ऑगस्ट २०२६ ) नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) गुंठेवारी विभागातील कार्यकारी अभियंता अनिल राठोड व कनिष्ठ अभियंता दिपाली कुमरे (पिसे) यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत अन्याय अत्याचार प्रतिकार संघटनेने पत्रकार परिषद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील मेश्राम यांनी आरोप केला.
सुनील मेश्राम यांनी सांगितले की, एनआयटी गुंठेवारी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वीही भ्रष्टाचारासंदर्भात लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर अद्याप ठोस व योग्य कारवाई झालेली नाही. विशेषतः कनिष्ठ अभियंता दिपाली कुमरे यांची बदली झाल्यानंतरही त्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होता जुन्याच ठिकाणी कायम राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रशासकीय कामकाजाचा मोठा बोजवारा उडाला असून अनेक कामे ठप्प पडल्याचे मेश्राम यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत गुंठेवारी विभागातील काही प्रकरणांचाही उल्लेख करण्यात आला. मौजा दाभा, ख.क्र. 115 येथील विकास आराखड्यातील (DP Road) रस्त्याने बाधित नसतानाही बेकायदेशीरपणे डिमांड नोट जारी करण्यात आल्याचा, तसेच मौजा दाभा, ख.क्र. १४०, १४१ येथील भूखंड नाल्याच्या लगत/किनाऱ्यावर असतानाही अनधिकृतपणे नियमित (Regularize) करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला.
या सर्व प्रकरणांची सखोल, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करावे आणि चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर शासकीय सेवेतून बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी अन्याय अत्याचार प्रतिकार संघटनेने केली आहे. संघटने च्या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पत्रकार परिषदेला सुनील मेश्राम, दिनेश अंडरसहारे, किशोर सोमकुवर आणि निरंजन दहिवले उपस्थित होते.

































































































































































































































































































































































































































































































