वाहने चोरणारा सराईत गुन्हेगार शस्त्रासह जेरबंद; २ गुन्हे उघडकीस!
★ मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचून कारवाई: १.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन दुचाकी जप्त
नागपूर ( दि. १७ सप्टेंबर २०२६ ) पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्त घालत असताना वाहन चोरी करणाऱ्या एका शातीर आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे. आरोपीच्या तावडीतून चोरीच्या २ मोपेड गाड्या आणि १ स्टीलचा धारदार चाकू असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे वाहन चोरीचे २ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.५० ते ४.३० वाजेदरम्यान पाचपावली पोलिसांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, मोतीबाग रेल्वे क्रॉसिंगजवळील भोला हायस्कूलच्या मागे एक संशयित इसम सुझुकी ॲक्सेस मोपेड (क्र. MH 49 CK 6636) वरून संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तपास पथकाने तात्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष विचारपूस केली असता, त्याने आपले नाव हर्षल उर्फ हरशू मुकेश तभाने (वय १९ वर्षे, रा. हुडको कॉलनी, LIG क्वार्टर क्र. ५८४, इमारत क्र. ४९, जरीपटका, नागपूर) असे सांगितले.
आरोपीची व वाहनाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १,५०० रुपये किमतीचा स्टीलचा चाकू मिळून आला. वाहनाबाबत कागदपत्रांची मागणी केली असता त्याने कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत व वाहन चोरीचे असल्याचे कबूल केले. अधिक चौकशीत त्याने जरीपटका हद्दीतून आणखी एक होंडा ॲक्टिव्हा मोपेड (क्र. MH 49 CT 6510) चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपी हर्षल हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पाचपावली, जरीपटका, हिंगणा, गिट्टीखदान, हुडकेश्वर व सक्करदरा पोलीस ठाण्यात वाहनचोरी व घरफोडीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाचपावली पोलिसांनी कलम ४, २५ भाहत्या सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.



























































































































































































































































































































































































































































































































































