दिल्ली पब्लिक स्कूल, मिहान येथे सहाव्या वार्षिकोत्सव उत्साहात
नागपूर ( दि. १४ डिसेंबर ) दिल्ली पब्लिक स्कूल, मिहानचा सहावा वार्षिकोत्सव सोहळा शनिवार १३ डिसेंबर रोजी शाळेच्या भव्य मैदानावर प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला.
या उत्सवाची यावर्षीची थीम होती - जग एक, आश्चर्ये अनेक- एक संगीतमय जागतिक साहस. ही जागतिक संस्कृती, एकता आणि सुसंवाद स्वीकारण्याची कल्पना जिवंत कलात्मक अभिव्यक्तींद्वारे सुंदरपणे मांडली. प्री-नर्सरी ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या ९०० हून अधिक तरुण बाल कलाकारांद्वारे संगीत, नृत्य, नाटक आणि सर्जनशीलतेचे एक आनंददायी मिश्रण सादर करण्यात आले. ज्यामुळे उपस्थित प्रेक्षकांना एका उत्कृष्टतेचा अनुभव घेता आला. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
यावेळी प्रामुख्याने प्रसिद्ध गायक आणि सा रे गा मा पा चे विजेते अनिरुद्ध जोशी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रख्यात नाट्यव्यक्तिमत्व आणि बाल रंगमंचचे संचालक संजय पेंडसे आणि प्रसिद्ध बालकलाकार अवनी जोशी हे सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाला दिल्ली पब्लिक स्कूल कामठी रोड आणि मिहानच्या अध्यक्षा व प्रो-व्हाईस चेअरपर्सन तुलिका केडिया यांची आभासी पद्धतीने उपस्थिती लाभली. याचबरोबर दिल्ली पब्लिक स्कूल कामठी रोड आणि मिहानच्या संचालिका सविता जयस्वाल, दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी रोडच्या प्राचार्या योगिता उमाळकर आणि बर्सर इंद्रजीत परगनिहा यांचीही उपस्थिती लाभली. दिल्ली पब्लिक स्कूल, मिहानच्या प्राचार्या निधी यादव यांनी यावेळी प्रेरणादायी भाषण देऊन उपस्थितांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेचे कौतुक केले. आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाने नृत्य, संगीत व नाट्य आकर्षणाच्या अखंड मिश्रणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विविध संस्कृतींचे प्रदर्शन करणाऱ्या लहान मुलांच्या उत्साही सादरीकरणाने प्रत्येकाचे मन मोहून टाकले. संध्याकाळचे एक विशेष आकर्षण म्हणजे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, जिथे बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा, शिस्त आणि सह-अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी सन्मानित करण्यात आले. या भव्यदिव्य समारंभाने विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा व सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आजच्या चिमुकल्यांच्या मनमोहक सादरीकरणाने , त्यांच्या आनंदी हास्यमुद्रेने तसेच पालकांच्या कौतुकामुळे डीपीएस मिहानच्या अखंड प्रवासात आणखी एक संस्मरणीय टप्पा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या निधी यादव यांचे सुयोग्य मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक - शिक्षिकावृंद व कर्मचारी वर्गाने यासाठी अथक परिश्रम केले.




























































































































































































































































































































































































































