यशोधरानगरात तडीपार आरोपीकडून बेकायदेशीर दारूसाठा जप्त, गुन्हा दाखल
★ यशोधरानगर पोलिसांची धडक कारवाई
विशेष बातमी
नागपूर:( दि. १८ सप्टेंबर २०२६ ) यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस्कॉर्ट पथकाने धडक कारवाई करत एका तडीपार आरोपीला बेकायदेशीर दारूची विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर देशी व गावठी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १:०५ ते १:४० वाजेच्या सुमारास एस्कॉर्ट पथकाला गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे यशोधरानगर चौक, लाल झेंडा चौकाजवळ राहणारा बाबूलाल गोविंदलाल घुमे (वय ६५ वर्ष) याच्या घरी पंचसमक्ष धाड टाकण्यात आली.
झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून देशी दारू संत्रा ९० मि.ली. च्या ५४ बाटल्या, हातभट्टी व मोहफुलाची गावठी दारू ६० लीटर दारूसाठा व रोख रक्कमेसह एकूण १८,३७० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अभिलेख तपासला असता बाबूलाल घुमे हा सराईत दारू विक्रेता असल्याचे निष्पन्न झाले. आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस उपआयुक्त (परिमंडळ क्र. ५) यांनी त्याला १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी तात्पुरते तडीपार केले होते.
तडीपारीच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून अवैध दारू बाळगल्याप्रकरणी आरोपीविरोधात यशोधरानगर पोलीस ठाण्यात कलम २२३ भा.न्या.सं. व सहकलम ६५ (ई) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जप्त मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भगवान कोळी, मपोउपनि स्वाती देशमुख, पोलीस अंमलदार विजय गिरी, आशिष गायधने, अर्शद शेख, मनोज निमकर, दिनेश क्षीरसागर, रवि असहिरे व चापोअं. चंद्रकांत यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



























































































































































































































































































































































































































































































































































