जी. प. बांधकाम विभागा कडून माहिती कायद्याचे उल्लंघन
कल्पना इखार बांधकाम अभियंत्यावर कारवाई करीता अपील दाखल
नागपूर ( दि. २ में ३०२५ ) जिल्हा परिषद बांधकाम विभागात माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मोहगाव झील्पी (ता. हिंगणा) येथील विकास कामां संबंधी माहिती मागणाऱ्या अर्जदाराला वेळेत माहिती न पुरवल्याने जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या विरोधात राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल करण्यात आले आहे.
गजानन ढाकूलकर यांनी मोहगाव झील्पी येथील रेणुका मंदिराच्या परिसरातील २०२३-२०२४ मधील शासकीय निधीतून मंजूर झालेल्या विकासकामांची माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी कामांची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदारांसंबंधी कागदपत्रे मागितली होती. नियमानुसार ३० दिवसांच्या आत माहिती मिळणे अपेक्षित असताना, तब्बल १०० दिवस उलटूनही अर्जदाराला कोणतीही माहिती मिळाली नाही.
यामुळे ढाकूलकर यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा बांधकाम अभियंता श्रीमती कल्पना इखार यांच्याकडे अपील केले. मात्र, ६५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी होऊनही श्रीमती इखार यांनी यावर कोणतीही सुनावणी घेतली नाही.
अखेरीस, गजानन ढाकूलकर यांनी राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर यांच्याकडे दुसरे अपील दाखल केले आहे. अर्जात, माहिती दिल्यास बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहार उघडकीस येईल, या भीतीने माहिती दडपण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जदाराने आयोगाकडे जन माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्याचे आदेश देण्याची आणि कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.




























































































































































































































































































































































































































