स्टडी टेबल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, गेम्सवर उड्या; वापरात नसलेल्या वस्तूंना मिळाले नवे आयुष्य
★ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा बाजारचा उत्साहात शुभारंभ
नागपूर, ( २३ जुलै २०२६ ) वॉचमनने आपल्या मुलासाठी सायकल घेतली, तर एका पित्याने हुशार मुलीसाठी स्टडी टेबल निवडले. गेम्स पाहताच एका चिमुकल्याने हट्ट धरला आणि वडिलांनाही तो मोडता आला नाही. कुणाच्या तरी घरात धूळ खात पडलेल्या या आणि अशा अनेक उपयोगी वस्तूंना अनोखा बाजार मुळे नवे आयुष्य मिळाले. गरजूंना आवश्यक वस्तू विनामूल्य मिळाल्याने या उपक्रमाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सोबत पालकत्व प्रकल्प, दि फ्रेण्ड्स को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि सोबत पालकत्व प्रकल्पाचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी यांच्या प्रेरणेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अनोखा बाजार या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी तात्या टोपे नगर येथील तात्या टोपे हॉलमध्ये उत्साहात झाले.
दि फ्रेण्ड्स को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.चे अध्यक्ष सुभाष मंडलेकर, सचिव डॉ. सुरेश तेलंग आणि संदीप जोशी यांच्या हस्ते फीत कापून बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
घरात वापरात नसलेल्या, मात्र चांगल्या स्थितीतील वस्तू गरजूंना उपलब्ध करून देणे, पुनर्वापराला चालना देणे आणि समाजात परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या बाजारात लहान मुलांची खेळणी, पुस्तके, स्वयंपाकघरातील साहित्य, क्रोकरी, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खुर्च्या, डायनिंग टेबल, स्टडी टेबल, हँडबॅग, सायकली आदी दानदात्यांनी दिलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले होते.
सुभाष मंडलेकर यांनी या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या, तर संदीप जोशी यांनी उपक्रमामागील संकल्पना आणि समाजोपयोगी उद्दिष्टे उपस्थितांसमोर मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणव घुगरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योत्स्ना कुऱ्हेकर यांनी केले, तर आभार संदीप मानकर यांनी मानले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मंजूषा जोशी, आनंद टोळ, प्रकाश रथकंठीवार, प्रणय मोहबंसी, गजानन निशितकर, कौशिक जोशी आणि वंदना शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भरणार 'अनोखा बाजार'
अनोखा बाजार' हा उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत भरविण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी सुरुवातीला १०० रुपये सेवा शुल्क भरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला एका वेळी दोन वेगवेगळ्या वस्तू पूर्णपणे निःशुल्क घेता येतील.
वापरण्यायोग्य स्थितीतील वस्तू दान करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी पंचायतन अपार्टमेंट, प्लॉट क्र. १७६, फ्लॅट क्र. १०४, आरपीटीएस रोड, लक्ष्मीनगर, नागपूर येथे त्या जमा कराव्यात. वस्तू स्वीकारण्यासाठी दर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कलेक्शन सेंटर सुरू राहणार आहे.

































































































































































































































































































































































































































































































