हिंगण्यात राष्ट्रभक्ती समूहगीतांच्या सुरांनी विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने
हिंगणा ( दि. २४ जाने. २०२६ ) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हिंगणा तालुक्यात देशभक्तीचा मळा फुलला. निमित्त होते यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र नागपूर, व श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था, हिंगणा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तालुका स्तरीय आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून टाकले. हम सब भारतीय है, साथ चले हम साथ लडे हम मंजिल हमारी एक है अशा ऐक्याच्या सुरांपासून ते वतन है हमारा प्यारा हिंदुस्थान अशा अभिमान गीतांपर्यंत अनेक रचनांनी कार्यक्रमाची उंची वाढवली.
कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण सेंटरचे जिल्हाध्यक्ष महेश बंग, उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे, कोषाध्यक्ष रवींद्र देशमुख, संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा अरुणा बंग, प्राचार्य नितीन तुपेकर, मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, मुख्याध्यापक संदीप कैलुके, मुख्याध्यापक देवेंद्र फटिंग आणि इशानी मित्रा यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देताना मान्यवरांनी अशा उपक्रमांतून उद्याचा सुजाण नागरिक घडतो, असा विश्वास व्यक्त केला.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध गीतांतून देशाच्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन घडवले. हम पर प्रहार करणे वाले चिंता कर अपने प्राणो कि, मत देख देश ने तुझे क्या दिया ये सोच तुने देश को क्या दिया, आणि जहाँ डाल डाल पर सोने कि चिडियाँ ओ भारत देश है मेरा या गीतांनी श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे केले. विशेषतः हिमालयावर संकट येता सह्याद्री धावतो आणि हे माय भू फेडील पांग तुझे या मराठी गीतांतून महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा गायली गेली. नेत्रहिनांनी गायले देशभक्तीचे गोडवे या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. समतेचा आणि विश्व शांतीचा भारत देश महान, आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, हे वंदनीय भारता हे अभिनंदनीय भारता आणि दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिये अशा गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अखंड भारताचे चित्र उभे केले. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल' या गीताने महात्म्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
दोन गटांत पार पडलेल्या या स्पर्धेत अ गटात (वर्ग ५ ते ७) १८ शाळा तर ब गटात (वर्ग ८ ते १०) ११ शाळांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध गायिका स्मृती मुलमुले व राधा ठेंगडी यांनी परीक्षक म्हणून निकाल दिला. अ गटात स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरीने प्रथम (२१०० रु.) इंटरनॅशनल स्कूल नागलवाडीने द्वितीय (१५०० रु.), तर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल सुकळीने तृतीय (११०० रु.) क्रमांक पटकावला. स्व. देवकीबाई बंग विद्यालय व जि. प. प्राथमिक शाळा धनगरपुरा यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. ब गटात इसेन्स इंटरनॅशनल स्कूल नागलवाडीने प्रथम, स्कूल ऑफ स्कॉलर्स वानाडोंगरीने द्वितीय, तर बालाजी हायस्कूलने तृतीय स्थान प्राप्त केले. ज्ञानज्योती निवासी अंध विद्यालय व नेहरू विद्यालय हिंगणा यांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे नेटके संचालन आनंद महाले यांनी केले, तर आभार स्मिता मोहरील यांनी मानले.




























































































































































































































































































































































































































