इंदोरा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या नालंदा मुलींचे वसतिगृहात महिला व बालविकास विभागाची धाड
★ २९ मुलींची सुटका, वसतिगृहाचे संचालन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
नागपूर: ( दि. १८ फेबु. २०२६ ) इंदोरा बुद्धविहार अंतर्गत सुरू असलेले नालंदा मुलींचे वसतिगृह अवैधरित्या चालविले जात असल्याची प्राप्त माहितीच्या आधारावर महिला व बालविकास विभागाने इंदोरा येथील नालंदा मुलींचे वसतिगृहात धाड टाकून कारवाई करीत २९ मुलींची सुटका करण्यात केली. तर वसतिगृहाचे संचालन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार, पथकाने तपासणी केली असता वसतिगृहाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे, अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र, तसेच नियमानुसार अधीक्षक, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती नसल्याचे आढळून आले. बालगृहात स्वच्छतेचा अभावही दिसून आला. विशेष म्हणजे कोणतीही अधिकृत नोंदणी नसताना इतर राज्यांतील तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील व दोन अनाथ मुलींना देखील दाखल करण्यात आले होते. चौकशीत मुलींच्या सुरक्षा संबंधित गंभीर त्रुट्या आढळल्या होत्या. यासंदर्भात नागपूर बालकल्याण समितीला माहिती देण्यात आली.
संबंधित संस्थेचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, उपाध्यक्ष भास्कर धमगाये, सचिव अमित गडपायले, अरूण नागदीवे, सुनील अंडरसहारे, रमेश डोंगरे, नितिन गणवीर, अजय निकोसे यांच्या विरोधात बाल संरक्षण अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ४१ व ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व मुलींची नालंदा वस्तीगृहातून मुक्त करून त्यांना शासकीय संरक्षणात ठेवण्यात आले आहे. ही कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण व संरक्षण अधिकारी चाईल्ड हेल्पलाइन प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे आदींनी केली.




























































































































































































































































































































































































































