रणजित मेश्राम, चळवळीतील बुलंद आवाज हरपला
(भूपेंद्र गणवीर)
नागपूर : ( दि. ४ मार्च २०२६ ) आंबेडकरी चळवळीला अनेक चेहरे लाभले. काही मैदानात झळकले. काही लेखणीतून पेटले. काहींनी आपल्या शांत, एकनिष्ठ उपस्थितीतून चळवळीचा आत्मा जपला. रणजित मेश्राम हे त्यातलेच एक होते. आवाज मोठा होता.पण अहंकार नव्हता. भूमिका ठाम होती. पण माणुसकी मृदू होती. चळवळीच्या स्मरणात कायम राहणारी एक चालती-बोलती व्यक्ती होती.
इंदोरा हा आंबेडकरी चळवळीचा बाल्लेकिल्ला. त्या मातीला संघर्षाची पार्श्वभूमी आहे. संघटनेची शिस्त आहे. स्वाभिमानाची धार आहे. इंदोऱ्यातील प्रत्येक घर, प्रत्येक चेहरा चळवळीशी नाळ जोडलेला आहे. विद्यार्थी दशेतच रणजित मेश्राम या प्रवाहात मिसळले. इंदोरा हा केवळ परिसर नव्हता. तो कार्यकर्ते घडविणारा कारखाना होता. त्यातून तावून-सुलाखून बाहेर पडलेले रणजित मेश्राम एक होते. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनमध्ये विविध पदांवर काम करताना ते अधिकच परिपक्व झाले. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनमध्ये त्यांनी संघटन कौशल्य, वैचारिक बांधिलकी आणि शिस्त यांची सांगड घातली. चळवळीत असतानाच शिक्षक पेशाकडे वळणे हा त्यांचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. लष्करीबागेतील गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू होताना त्यांनी ज्ञानदानाला संघर्षाची जोड दिली. वर्गात पुस्तक आणि बाहेर वास्तव दोन्हींचा मेळ साधत कार्यरत राहिले. वडिलाचे लवकर निधन झाले.आईने सर्व मुलांचा सांभाळ केला. ही जाणीव त्यांना होती. त्यांनी समाजासोबतच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्नांची मशाल पेटवली. पुढे पी. डब्ल्यू. एस. कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले. तेव्हा त्यांचा व्यासंग अधिक विस्तारला. तरीही पत्रकारितेचा धागा त्यांनी कधी तुटू दिला नाही.पत्रकारितेत रणजित मेश्राम हे स्वतंत्र अध्याय होते. लोकमत सोबत त्यांचा दीर्घ सहवास जुळला. तेव्हाचा काळ वेगळा होता. संगणक नव्हते, कागद आणि पेन होते. वेग नव्हता, पण वजनदार शब्द होते. रणजित शब्दांभोवती फिरत. एक-एक शब्द विचाराअंती लिहीत. बातमी तयार झाली की गप्पा रंगत.त्या गप्पांतूनच पुढील बातमीचा बीजांकुर फुटे. क्राईम हा त्यांचा आवडता बीट. विद्यापीठ बीटही त्यांनी समर्थपणे सांभाळला. पण त्यांच्या क्राईम बातम्यांनीच सर्वाधिक गाजवले. त्या कामगिरीची दखल म्हणून त्यांना भालाकार भोपटकर पुरस्कार मिळाला.तो सन्मान त्यांच्या प्रामाणिक परिश्रमांचा होता.
उत्तर नागपूर त्यांना मुळापासून ठाऊक. त्या भागाचा विस्तार त्यांनी जवळून पाहिला. बिडी कामगार, मिल कामगार, लाईनमन,गॅगमन अशी कामं करणाऱ्यांची वस्ती. तेथील माणसं मोठी होताना, घडताना पाहिली. वकील, अभियंते, डॉक्टर, लेखक, न्यायाधीश, प्राचार्य अनेकांचे आयुष्य त्यांच्या साक्षीने उभे राहिले. एकेकाळी रात्रीचे आठ वाजले की जिथे रिक्षेवालेही जात नव्हते. तिथे रणजित नावाचा अहुलिया निर्भयपणे ये-जा करत असे. पत्रकारिता ही त्यांच्यासाठी नोकरी नव्हती.ती समाजाशी असलेली बांधिलकी होती. त्यांनी निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन दिवसांनी मागे घेतला. सत्ता नव्हे, तर सत्य हेच त्यांचे राजकारण राहिले. ते खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष झाले. राज्यमंत्र्याचा दर्जा होता. लाल दिव्याची गाडी होती. ती त्यांनी कधी मिरवली नाही. पत्रकार सहनिवासाच्या आंत कधी दिसली नाही. फाटकाच्या बाहेरच पार्क करीत. राजकीय अस्थिरतेत ती फार काळ टिकली नाही. हा भाग वेगळा. त्या गाडीचा तोरा त्यांनी कधी दाखविला नाही. एकादी घटना मनाविरूध्द घडली की संताप व्यक्त करीत. काही क्षणातच असे काही घडले हे विसरून जात. ते प्रभावी वक्ते होते. त्यांची रिपब्लिकन पक्षाशी नाळ जोडलेली होती. ती शेवटपर्यंत कायम राखली. टेबलापेक्षा ते चहाच्या टपरीवर अधिक खुलत. चहाच्या गरम घोटासोबत जुन्या आठवणी उलगडत; आता तुमच्याकडे साधनं आहेत. आमची सायकल पत्रकारिता होती.असे म्हणत ते हलकेच चिमटे काढत.
आता मी निघतो...!
किस्से सांगताना वेळेचे भान हरपत. मग अचानक म्हणत तुम्ही जा! तुमचं काम बाकी आहे. माझं काम झालं. आता मी निघतो....! गेल्या काही महिन्यांत ते मौनात गेले. हॉस्पिटलमध्ये भेट झाली. डोळ्यांत ओळख होती. पण शब्द हरवले होते. कदाचित शब्दांनीही विश्रांती घेतली होती. त्यामुळेच त्यांनी “आता मी जातो” असा निरोप न घेताच प्रस्थान केले. ते कायमचेच.. न भेटण्यासाठी... बुद्धचरणी विलीन होण्यासाठी. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. चळवळीच्या सभेतला एक बुलंद आवाज अचानक थांबला.
रणजित मेश्राम हे शिक्षक, पत्रकार कार्यकर्ता म्हणून वावरले. ते आंबेडकरी चळवळीत अखेरपर्यंत सक्रीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना रोजच्या व्यवहारात उतरवणारे. त्यांच्या लेखणीतून न्यायाची भाषा उमटली. त्यांच्या वागण्यातून समतेची साक्ष मिळाली. त्यांचा बातमीपेक्षा माणूस कसा असावा यावर भर होता.आज ते चहाच्या टपरीवर नाहीत. गप्पा थांबल्या आहेत. पण त्यांनी दिलेला ध्यास, दिलेली दिशा आणि दिलेली माणुसकी शिल्लक आहे. रणजितभैय्या, शेवटचा “जयभीम” तुमचा आवाज थांबलेला नाही. तो चळवळीच्या प्रत्येक पावलात अजूनही घुमतो आहे.




























































































































































































































































































































































































































