मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये रक्तरंजित थरार; तरुणीचा मृत्यू, तरुण गंभीर
नागपूर:( दि. १९ ऑगस्ट २०२६ ) मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये एक युवती आणि एक युवक रक्ताच्या थारोळ्यात सापडले. दोघांच्याही शरीरावर चाकूचे अनेक घाव असल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उघड झालेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.
मृत युवतीचे नाव शिवानी राजानंद गजभिये (वय २८) असून ती अजनीतील शताब्दी चौकात राहते. तर, गंभीर जखमी असलेल्या संशयिताचे नाव किरण संजय आत्राम (वय अंदाजे २८ ते ३०) आहे. किरण अजनीच्या रेल्वे वसाहतीत राहतो. मनीषनगरातील अजित बेकरीमागे हॉटेल हॉटेलच्या ज्या रूममध्ये हा थरार घडला, त्या रूमचा नंबर ३०२ आहे. रुममधील दृश्य भीषण होते. एकीकडे रूममधील बेड गुलाबांच्या पाकळ्यांनी सजविला होता. तर, दुसरीकडे सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. शरीरावर चाकूचे अनेक घाव असलेली शिवानी निपचित पडून होती. तिची भांग रक्ताने भरलेली होती. गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे दिसून येत होते. तर शेजारीच किरणदेखील जखमी अवस्थेत पडून होता. त्यावरून आरोपीने स्वतःला जखमी करून तिच्या भांगेत कुंकूऐवजी स्वतःचे रक्त लावले असावे, असा अंदाज आहे.
आज हे दोघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी रूम भाड्याने घेतली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास अचानक त्यांच्या रूममधून किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. - परिणामी बाजूच्या रूमसह हॉटेल व्यवस्थापनाने तिकडे धाव घेतली. आतमध्ये शिवानी गजभिये तसेच किरण आत्राम रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. बाजूलाच चाकू पडून होता. हे दृश्य पाहून हॉटेल व्यवस्थापनाने बेलतरोडी पोलिसांना कळविले. पोलिसांचा ताफा - घटनास्थळी पोहोचला. शिवानी गजभियेचा मृत्यू झाला होता. संशयित किरण गंभीर अवस्थेत होता. दोघांनाही पोलिसांनी मेडिकलमध्ये पाठविले. डॉक्टरांनी किरणवर तातडीने उपचार सुरू केले.

































































































































































































































































































































































































































































































