रामटेकचा ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा संकल्प! - चंद्रपाल चौकसे
★ रामटेकची शोभायात्रा 23 नोव्हेंबरला; 45 वर्षांचा वैभवशाली निरंतर वारसा.
★ धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी भारतीय जनसेवा मंडळाचा पुढाकार!
रामटेक : ( दि. १० नोव्हें २०२६ ) प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरीतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढविणारी भव्य शोभायात्रा यंदा २३ नोव्हेंबर रोजी उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय जनसेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या शोभायात्रेचे यंदा ४५ वे वर्ष असून, रामटेकच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक बनलेली ही शोभायात्रा नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित न राहता रामटेकसह संपूर्ण विदर्भातील धार्मिक पर्यटनाला चालना देणे, ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि सामाजिक सेवेचे व्यापक कार्य उभे करणे, हा मंडळाचा मानस असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी दिली. यंदाच्या शोभायात्रेत ट्रक/ट्रॅक्टरवर साकारण्यात येणाऱ्या झाक्या, चालत्या-बोलत्या झाक्या तसेच पायी सादर होणाऱ्या विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील आकर्षक झाक्यांचा समावेश असणार आहे. सहभागींचा उत्साह वाढविण्यासाठी भारतीय जनसेवा मंडळाच्या वतीने तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी समाजातील गोरगरीब नागरिकांपासून ते सधन व्यक्तींपर्यंत सर्वच स्तरांतील नागरिक स्वेच्छेने आर्थिक योगदान देतात. निधी कितीही असला तरी प्रत्येकाच्या योगदानाचा मंडळाकडून समान आदर केला जातो. लोकसहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम रामटेकच्या सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा ठरत आहे.
*रामटेकचा ऐतिहासिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा संकल्प!*
• अयोध्येनंतर प्रभू श्रीरामांच्या धार्मिक महत्त्वाशी नाते सांगणारे रामटेक हे एक महत्त्वपूर्ण पवित्र स्थान आहे. मात्र, रामटेकला लाभलेला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा पाहता येथे अपेक्षित पर्यटन विकास झालेला नाही, अशी खंत चंद्रपाल चौकसे यांनी व्यक्त केली. रामटेकला महाकवी संत कालिदास, संत अगस्त्य आश्रम, नागार्जुन महाराज आणि राजा वाकाटक यांच्या इतिहासाचा समृद्ध वारसा लाभला आहे. या ऐतिहासिक ठेव्याची योग्य ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी प्रभावी नियोजनाची आवश्यकता आहे. रामटेकच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित 'लाइट अँड साऊंड शो' सुरू करण्यात आल्यास येथील इतिहास नव्या पिढीसमोर आणि देश-विदेशातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे मांडता येईल. यामुळे रामटेकला महाराष्ट्रातील अग्रगण्य धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यास मोठी मदत होऊ शकते, असा विश्वास चौकसे यांनी व्यक्त केला. संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटकांनी रामटेकला भेट द्यावी, येथील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्याचा मंडळाचा मानस आहे. भारतीय जनसेवा मंडळाचे सामाजिक कार्य आता अधिकृतपणे नोंदणीकृत झाले असून, मंडळाच्या माध्यमातून आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मंडळाची १३ जणांची विश्वस्त समिती उत्साहाने कार्यरत आहे. जनसेवा मंडळाचे अध्यक्ष, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, महासचिव डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, सहसचिव सुभाष बघेले, कोषाध्यक्ष नत्थु घराजाळे, सदस्य धनराज काठोके, शेखर बघेले, विनायक डांगरे, ऋषी किमतकर, सुरेश सोनकुसरे, हुकूमचंद बडवाईक, मोहन कोठेकर, राहुल कोठेकर यांच्यासह अन्य विश्वस्तांचा समावेश आहे. आगामी काळात गोरगरिबांची सेवा, बेरोजगार युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे, गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर मंडळाचा भर राहणार आहे. भारतीय जनसेवा मंडळ केवळ शोभायात्रेचे आयोजन करणारी संस्था न राहता समाजातील सर्व घटकांसाठी कार्य करणारे सेवाभावी व्यासपीठ म्हणून नावारूपास येईल. आगामी एक-दोन वर्षांत मंडळाचे कार्यक्षेत्र आणि स्वरूप पूर्णपणे बदललेले दिसेल, असा ठाम विश्वास चंद्रपाल चौकसे यांनी व्यक्त केला. ४५ वर्षांची परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक शोभायात्रेत रामटेकसह परिसरातील भाविक, नागरिक, युवक आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या सहभागातून या सांस्कृतिक सोहळ्याची शोभा द्विगुणित करावी आणि रामटेकच्या धार्मिक व ऐतिहासिक वैभवाचा गौरव अधिक उंचीवर न्यावा, असे आवाहन भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे.
*शोभायात्रा म्हणजे रामटेकची आन, बान आणि शान!*
• रामटेकची शोभायात्रा ही केवळ धार्मिक मिरवणूक नसून शहराच्या एकात्मतेचे, सांस्कृतिक परंपरेचे आणि सामाजिक उत्साहाचे प्रतीक आहे. या दिवशी रामटेकमधील नागरिकांचे नातेवाईक, बहिणी, जावई तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने रामटेकमध्ये एकत्र येतात. संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. वर्षभर नागरिक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या शोभायात्रेला रामटेकच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.





























































































































































































































































































































































































































































































































































